अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मोताळा तालुक्यातील लालमाती नाफेड केंद्रावरून वखार महामंडळाकडे पाठवलेला लाखो रुपयांचा २७० क्विंटल हरभरा गायब करणाऱ्या टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत चाणाक्षपणे पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत २०० किलोमीटरच्या परिघातील तब्बल ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासून या गुन्ह्याचा छडा लावला. या धडक कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, ट्रक आणि हरभऱ्यासह एकूण १८,९१,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोताळा येथील ‘संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी’ (नाफेड सेंटर) चे अध्यक्ष राजेंद्र आनंदराव जंगले यांनी १२ मे २०२६ रोजी ‘लकी ट्रान्सपोर्ट’मार्फत एक ट्रक (क्रमांक एमएच-४३-यू-५२९० मलकापूर येथील वखार महामंडळात हरभरा पोहोचवण्यासाठी माल भरून दिला होता. ट्रकमध्ये १५,८६,२५० रुपये किमतीचा २७० क्विंटल सरकारी हमीभावाचा हरभरा (५४० कट्टे) होता. मात्र, ट्रक चालक आणि त्याच्या साथीदारांनी तो माल नियोजित ठिकाणी न नेpathवता परस्पर गायब केला व त्याचा अपहार केला. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने समांतर तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पथकाने राष्ट्रीय महामार्ग आणि ग्रामीण भागातील तब्बल ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी ट्रक चालक शेख आमीन शेख जमील याला मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींसह थेट तेल्हारा (जि.अकोला) गाठून विकलेला हरभरा आणि मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी चालक शेख आमीन शेख जमील (वय ३३ वर्षे) रा.पारपेठ, मलकापूर, शेख समीर शेख सलीम (वय २७ वर्षे) रा. पारपेठ, मलकापूर, शेख सादीक शेख नूरमोहम्मद (वय २४ वर्षे) रा.पांढरी पारपेट, मलकापूर, मो. मुस्तकीन मो. मुशीर शेख (वय ३४ वर्षे) रा. इदगाह प्लॉट, मलकापूर, सोहील खान उर्फ शोएब युन खान (वय २३ वर्षे) रा. पारपेट, मलकापूर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी धामणगाव बढे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
यांनी बजावली कामगिरी
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पीएसआय अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, विजय पैठणे, गजानन गोरले, विकास देशमुख, निवृत्ती पुंड आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी ही कामगिरी बजावली.
