अजय टप
धामणगाव बढे,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि ‘रील’ बनवून लाईक्स-फॉलोअर्स मिळवण्यासाठी तरुण पिढी कोणत्याही थराला जात असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. असाच एक धक्कादायक आणि कायद्याचे उल्लंघन करणारा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातून समोर आला आहे. एका हळदीच्या घरगुती कार्यक्रमात बेकायदेशीररी्या तलवार बाळगून, ती हवेत नाचवत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे संबंधित तरुणांना भलतेच महागात पडले आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलिसांनी तातडीने पावले उचलत, बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकारणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये तीव्र खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून आणि दाखल फिर्यादीवरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील खेडी येथील रहिवासी महेंद्रसींग सुभापसींग राजपुत यांच्या घरी १२ मे २०२६ रोजी लग्नकार्यानिमित्त ‘हळदीचा कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. लग्नघरात आनंदाचे वातावरण होते, नातेवाईक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास डिजेच्या तालावर सर्वजण नाचत असताना, अचानक यातील मुख्य आरोपी विरेंद्रसिंग सुभापसींग राजपुत आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार तिथे आले.
कोणताही परवाना नसताना आणि शासनाने ज्या शस्त्रांवर पूर्णपणे बंदी घातली आहे, अशी धारदार तलवार विरेंद्रसिंग याने आपल्या ताब्यात ठेवली होती. केवळ एवढ्यावरच न थांबता, विरेंद्रसिंग आणि त्याच्या दोन साथीदारांनी ती तलवार सार्वजनिक जागेत, म्हणजेच हळदीच्या कार्यक्रमात सर्वांसमोर हवेत नाचवण्यास सुरुवात केली. डिजेच्या गाण्यावर तलवारीसह केलेले हे हिंसक आणि भीतीदायक नृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याद्वारे परिसरात एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अंमलदार लोखंडे यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांत कलम ४, २५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ सह कलम महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बाठे हे करीत आहेत.
‘इन्स्टाग्राम रील’च्या नादात कायदा विसरले!
हा सर्व प्रकार सुरू असताना, तिथे उपस्थित असलेल्या आणि ‘G_K_CINAMATIC’ हा इन्स्टाग्राम आयडी चालवणाऱ्या अज्ञात व्हिडिओ ग्राफर/एडिटरने या गंभीर कृत्याचा आपल्या कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट केला. त्यानंतर, समाजात किंवा कायद्याची कोणतीही भीती न बाळगता, हा व्हिडिओ अधिक आकर्षक आणि ‘ग्लोरिफाय’ करून सदर इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला. सोशल मीडियाच्या अल्गोरिदममुळे हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्याने गावातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलीस प्रशासनाची तत्परता आणि गुन्हा दाखल
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो धामणगाव बढे पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा दहशत पसरू नये म्हणून जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे थेट उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुरज अशोक रोकडे यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन या प्रकरणी तक्रार दिली. माननीय ठाणेदार साहेब यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली दिनांक २० मे २०२६ रोजी रात्री सव्वादहा वाजता आरोपींवर भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हादाखल करण्यात आला.
