खामगावात गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ४ लाखांच्या मुद्देमालासह ७ बैलांची सुटका, दोन आरोपींना अटक

अजय टप

खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): खामगाव शहर पोलिसांनी अकोला बायपासवरील बाळापूर नाका परिसरात धाडसी कारवाई करत बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ७ गोवंश जातीच्या बैलांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक मिनी ट्रक आणि दोरीसह एकूण ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२६ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस काँस्टेबल जावेद युसुफ शेख हे पथकासह परिसरात वाहतूक नियमन करीत होते. दरम्यान, एका गुप्त बातमीदाराकडून त्यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, एका वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्परतेने अकोला बायपासवरील ‘इस्मो टेक्स्टाईल’ समोर, बाळापूर नाका येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद वाटणारे महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक क्रमांक एमएच-४७-वाय-५९२८ येताना दिसले. पोलिसांनी हात दाखवून वाहन थांबवले आणि वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये अत्यंत धक्कादायक आणि क्रूर प्रकार उघडकीस आला. वाहनाच्या आत ७ गोवंश जातीचे बैल अतिशय दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून ठेवले होते. जनावरांना हालचाल करण्यास अजिबात जागा नव्हती, तसेच वाहनात हवेची कोणतीही सोय नव्हती. त्यांना खाण्यासाठी चारा किंवा पाण्याचीही व्यवस्था न करता, अत्यंत वेदनादायक स्थितीत कत्तलीच्या उद्देशाने वाहून नेले जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ७ गोवंश (अंदाजे किंमत ६२ हजार रुपये), महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक (अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार रुपये, दोरखंड (अंदाजे किंमत ५०० रुपये), असा एकूण जप्त ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी शफिक मुसा शेख (वय ३४ वर्षे), शेख महंमद शेख गफर (वय ४८ वर्षे) (दोघेही रा. पिंपळदरी, बाळापूर, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजी नगर) यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शेख जावेद शेख जाफर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!