मलकापूर हादरले! ७ वर्षीय चिमुरडीसोबत गैरकृत्य करणाऱ्या ५० वर्षीय नराधमावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

अजय टप

मलकापूर (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ७ वर्षांच्या एका निष्पाप चिमुरडीला पैशांचे आमिष दाखवून, दुकानाचे शटर बंद करून तिच्यासोबत गैरकृत्य केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय नराधमाविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुरेशी मोहल्ला, पारपेट भागातील रहमिया मशिदीजवळ ही घटना घडली. पीडित ७ वर्षीय बालिका आरोपीच्या दुकानासमोर खेळत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी मोहम्मद आबीद मोहम्मद यार (वय ५० वर्ष) याने मुलीला दुकानात बोलावले. त्यानंतर आरोपीने दुकानाचे शटर बंद करून घेतले आणि मुलीसोबत जबरदस्ती करत गैरकृत्य केले. एवढेच नव्हे तर, “हे कोणाला सांगू नको, तुला १०० रुपये देतो,” असे म्हणत चिमुरडीला धमकावण्याचा व आमिष दाखवण्याचाही प्रयत्न केला.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलगी रडत रडत आपल्या वडिलांजवळ गेली. वडिलांनी विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व आपबिती सांगितली. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांत उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४ सह पोक्सो कायदा कलम ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!