अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत महिला आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून काही दिवसांच्या अंतराने चार महिला व मुली गूढरीत्या बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये एका एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या घटनांचा घेतला आढावा.
बोरखेडी: मोताळा तालुक्यातील एका गावातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एक २१ वर्षीय विवाहित महिला तिच्या अवघ्या १२ महिन्यांच्या (१ वर्ष) मुलीला सोबत घेऊन प्रवासासाठी निघाली होती. त्या दोघी मोताळा बस स्थानकावरून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी बसमध्ये बसल्याचे समजते. मात्र, त्या आपल्या नियोजित स्थळी पोहोचल्याच नाहीत. नातेवाईकांनी तात्काळ संभाव्य सर्व ठिकाणी, इतर नातेवाईकांकडे आणि ओळखीच्या लोकांकडे शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली आहे. एका तरुण मातेसह तिची निष्पाप चिमुरडी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नांदुरा: नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २१ वर्षीय तरुणीच्या अचानक बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही तरुणी आपल्या घरातून मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगून निघाली होती. एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने ती मैत्रिणीकडे मेहंदी काढण्यासाठी जात असल्याचे तिने घरच्यांना सांगितले होते. परंतु, ती मैत्रिणीकडे पोहोचलीच नाही आणि रात्री उशिरापर्यंत घरीही परतली नाही. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात आणि तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता, ती कोणालाही भेटली नसल्याचे समोर आले. यानंतर तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
शिवाजीनगर: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या घाटपुरी भागातून एका ३६ वर्षीय महिलेच्या बेपत्ता होण्याची नोंद झाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. सदर महिला एका कुटुंबासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. घरातील काही व्यक्तींना वैद्यकीय आणि कौटुंबिक मदतीची गरज असल्याने ती तिथे काळजीवाहू आणि कौटुंबिक सदस्य म्हणून वावरत होती. घटनेच्या दिवशी घरातील मुख्य व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ती वेळ साधून ही महिला कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. घरमालक आणि शेजाऱ्यांनी तिला बाहेर जाताना पाहिले होते, परंतु ती नेहमीप्रमाणे जात असावी असे त्यांना वाटले. मात्र, ती परत न आल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
देऊळगाव राजा: देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथून एका १९ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची घटना उघडकीस आली आहे. ही तरुणी रात्रीच्या वेळी घरात सर्वजण झोपलेले असताना, कोणालाही काहीही न सांगता घरातून अचानक निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांना ती खोलीत दिसली नाही, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घरात तपास केला असता, घरातील काही रोकड रक्कमही गायब असल्याचे आढळून आले. कुटुंबाने तात्काळ गावात आणि परिसरात शोध घेतला, मात्र यश आले नाही. अखेर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात यासंबंधी कायमी मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या घटनांकडे केवळ गुन्हेगारी किंवा अपघाताच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्यामागील सामाजिक आणि कौटुंबिक कारणांचा वेध घेणेही गरजेचे आहे.
