अजय टप
सोनाळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कोणत्याही कारणाशिवाय एका घरात घुसून महिला, तिची मुलगा आणि मुलगी यांना जबरदस्तीने खाली लोटून देऊन, आरोपीने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोनाळा पोलिसांनी गावातीलच एका नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोनाळा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोनाळा येथील रहिवासी असलेल्या
४० वर्षीय महिला मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २२ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्या आपल्या घरात असताना, गावातीलच आरोपी दिलीप हा त्यांच्या घरात आला. काहीही कारण नसताना आरोपी दिलीप झाल्टे याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला अचानक जोराने खाली लोटून दिले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने अत्यंत विकृत आणि निर्लज्जपणाचे वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने स्वतःची पँट काढून पीडित महिला आणि तिच्या मुलीसमोर आपले लिंग दाखवून अश्लील चाळे केले. आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या लहान मुलालाही आरोपीने बेदम मारहाण करत खाली लोटून दिले. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारामुळे पीडित महिला आणि तिची मुले प्रचंड घाबरली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक गोळा झाले, ज्यांना पाहून आरोपीने तिथून पळ काढला.
याप्रकरणी पीडितेने सोनाळा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (१), ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गजानन खोने हे करीत आहेत. दिवसाढवळ्या घरात घुसून मजुरी करणाऱ्या एका महिलेसोबत आणि तिच्या अल्पवयीन मुलांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे सोनाळा गावासह संपूर्ण संग्रामपूर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
