अजय टप
जळगाव जामोद,(बुलढाणा): कौटुंबिक वादाचे पर्यवसान किती भीषण आणि भयानक असू शकते, याचा एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारा प्रकार जळगाव जामोद तालुक्यात समोर आला आहे. किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या अवघ्या २ ते ७ वर्षे वयाच्या चार निष्पाप चिमुरड्यांना विहिरीच्या पाण्यात फेकून देऊन त्यांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही त्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या खळबळजनक आणि वेदनादायी घटनेमुळे राजुरा बुद्रुक परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मृत आरोपी पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजुरा बुद्रुक (ता. जळगाव जामोद) येथील रहिवासी असलेला विजय मुसा किराडीया याचा दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला होता. हा वाद रात्री शांत झाला असे वाटत असतानाच, विजय याच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज २५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास, विजय किराडीया याने रागाच्या भरात आणि टोकाच्या मानसिक विकृतीतून आपल्या चारही लहान मुलांना सोबत घेतले. तो त्यांना घेऊन राजुरा शेत शिवारातील एका विहिरीवर गेला. तेथे त्याने कसलाही विचार न करता, आपल्याच रक्ताच्या चार चिमुरड्यांना एकामागून एक विहिरीच्या खोल पाण्यात फेकून दिले. निष्पाप मुले पाण्यात बुडत असताना, आरोपी विजय याने स्वतःही विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
निष्पाप चिमुरड्यांचा करुण अंत
या हृदयद्रावक घटनेत मृत्यूमुखी पडलेली चारही मुले अत्यंत लहान वयाची होती. खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःच्याच जन्मदात्याकडून त्यांच्यावर काळाने झडप घातली. यामध्ये प्रित विजय किराडीया (वय ७ वर्षे), प्राची विजय किराडीया (वय ५ वर्षे), पुर्वी विजय किराडीया (वय ४ वर्षे), पियुष विजय किराडीया (वय २ वर्षे) यांचा समावेश असून या चारही भावंडांचा विहिरीच्या पाण्यात गुदमरून अत्यंत करुण अंत झाला. या संतापजनक आणि दुःखद घटनेची माहिती मिळताच मुलांचे आजोबा आणि आरोपीचे वडील मुसा रालजी किराडीया (वय ६३ वर्षे) यांनी तातडीने जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी मृत आरोपी विजय मुसा किराडीया याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम १०३ (१) खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य आणि भीषणता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ राजुरा शेत शिवारातील घटनास्थळाला भेट दिली. गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीतून पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
समाजमन सुन्न: कौटुंबिक वादाचे भीषण वास्तव
कौटुंबिक कलह आणि पती-पत्नीमधील वाद आजकाल इतक्या टोकाला जात आहेत की, त्यामध्ये निष्पाप जीवांचा बळी जात आहे. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय संपूर्ण हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो, याचे हे अत्यंत विदारक उदाहरण आहे. ज्या मुलांनी अजून जगही पाहिले नव्हते, अशा ४ चिमुरड्यांना बापानेच मृत्यूच्या दरीत लोटल्याने राजुरा बुद्रुक गावात चूलही पेटली नाही. परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
