अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाला पुन्हा एकदा मोठे यश आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे आणि त्यांच्या पथकाने २५ मे रोजी मलकापूर शहरात एका हायप्रोफाईल कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. वाकोडी शिवारातील महावीर नगर भागात एका निवासी घरामध्ये सुरू असलेल्या या अनैतिक देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पुरुष आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेतले असून, दोन पीडित महिलांची नरकयातनेतून सुटका करण्यात आली आहे.
बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २५ मे २०२६ रोजी मलकापूर शहर आणि परिसरात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गस्त घालत होते. आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची ही कडक गस्त सुरू असतानाच, एपीआय यशोदा कणसे यांना मलकापूर जवळील वाकोडी शिवारात असलेल्या महावीर नगर येथील एका खाजगी घरामध्ये काही महिलांना आणून, त्यांच्याकडून जबरदस्तीने आणि पैशांचे आमिष दाखवून अनैतिक देहव्यापार करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ छापामार कारवाईची चक्रावून टाकणारी रणनीती आखण्यात आली. पोलीस पथकाने महावीर नगर येथील संशयित घरावर अचानक झडती घेतली. पोलिसांचे वाहन आणि फौजफाटा पाहून परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पोलिसांनी घराला चहूबाजूंनी वेढा घातला आणि घरात प्रवेश केला.
या छाप्यादरम्यान पोलिसांना अत्यंत धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. त्या घरामध्ये एक ग्राहक आणि दोन पीडित महिला आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्या. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना या दलदलीत ढकलणारे मुख्य सूत्रधार आणि तिथला व्यवस्थापक पोलिसांच्या जाळ्यात पुरते अडकले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पुरुष आरोपी आणि एका महिला आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आणि ताब्यात घेतले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३, ४, ५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून देहव्यापारातून कमावलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले दळणवळणाचे साहित्य, असा एकूण ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.
यांनी नोंदविला कारवाईत सहभाग
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या लेडी सिंघम सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे (कानडे), पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हाताळकर, विजय वारुळे, समाधान टेकाळे, अमोल वनारे, मंगेश सनगाळे, वैभव निंबाळकर, महिला पोलीस अंमलदार कोमल इंगळे, दिपाली चव्हाण, कोसे यांनी ही धाडसी कारवाई केली. विशेष म्हणजे या कारवाईत परीविक्षाधीन डीवायएसपी सागर कदम यांनी देखील सहभाग घेतला.
‘लेडी सिंघम’ यशोदाच्या धडाक्याने गुन्हेगार हादरले!
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे यांची जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून ख्याती आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला असून, अवैध धंदे चालवणाऱ्यांवर त्यांची विशेष करडी नजर असते. मलकापूर येथील या कारवाईत त्यांनी ज्या पद्धतीने गुप्त माहिती काढून, महिला पथकाला सोबत घेऊन रात्रीच्या वेळी हा यशस्वी छापा टाकला, त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत’, हा संदेश या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
