आमदार बच्चू कडूंचा बुलढाण्यात एल्गार!;पोलिसांच्या ‘त्या’ महापापाविरोधात मैदानात उतरणार; खकनारला जाऊन पीडित कुटुंबाची घेणार भेट

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा पोलिसांच्या अजब आणि क्रूर कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असतानाच, आता या प्रकरणाला मोठे राजकीय आणि सामाजिक वळण लागले आहे. पोलिसांच्या खोट्या तपासामुळे निष्पाप कुटुंबावर झालेल्या अमानुष अन्यायाचा जाब विचारण्यासाठी आणि आजही मोकाट फिरणाऱ्या खऱ्या मारेकऱ्यांना गजाआड करण्यासाठी आमदार बच्चू कडू आता थेट बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत आहेत. या गंभीर प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, या मागणीसाठी ते एक मोठे आणि आक्रमक आंदोलन छेडणार असल्याची माहिती खुद्द कडू यांनी दिली.

पोलिसांनी ज्या कुटुंबाला जिवंत मुलीच्या खुनाचा आरोपी बनवून नरकयातना दिल्या, त्या मध्य प्रदेशातील खकनार येथील पीडित कुटुंबाची आमदार बच्चू कडू प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. एका जिवंत मुलीला मृत घोषित करून तिच्या वृद्ध वडिलांना आणि भावाला ज्या क्रूरतेने पोलिसांनी बेदम मारहाण केली, त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्चू कडू स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. सोबतच मेलेली मुलगी जिवंत परत आल्यानंतरही पोलीस प्रशासन मूळ मुद्द्याला बगल देत आहे. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्यावर बच्चू कडू यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जळगाव जामोद परिसरात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडलेल्या ‘त्या’ दुर्दैवी मुलीचे खरे मारेकरी आजही मोकाट का? पोलीस त्यांचा शोध घेण्यास का टाळाटाळ करत आहेत?, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे का दाखल केले नाही, निष्पाप कुटुंबाचा छळ करणारे आणि सत्तेचा गैरवापर करून खोटा तपास रचणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, बुलढाणा पोलीस घटक संशयाच्या भोवऱ्यात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फतच झाली पाहिजे, यासह अन्य मागण्यांसंदर्भात हे आंदोलन होणार असून ज्या खाकी वर्दीने एका निरपराध बापाचा आणि भावाचा अमानुष छळ केला, त्या दोषी अधिकाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. गरिबांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही!, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!