अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) :विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात पुन्हा एकदा अवैध वाळू साठ्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. मदार टेकडी परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, याबाबत महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार समाधान सोनोने यांनी अवैध वाळू वाहतूक आणि साठेबाजांविरुद्ध धडक कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते. त्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, सध्या शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणात वाळू साठा होत असल्याच्या चर्चांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, जर शहरात आणि मदार टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळू साठवली जात असेल, तर संबंधित विभागाच्या निदर्शनास ही बाब आली आहे का? आणि आली असेल तर कारवाई का होत नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात महसूल विभाग नेमकी काय भूमिका घेणार, तहसीलदार पुन्हा धडक कारवाईचा बडगा उगारणार का, की वाळू साठेबाजांना अभय मिळणार, याकडे संपूर्ण मलकापूर तालुक्याचे लक्ष लागून आहे. अवैध वाळू साठ्यांच्या वाढत्या चर्चांमुळे महसूल प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, आगामी काळात यावर काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
