धाड येथील भोंडे पेट्रोल पंप चोरी प्रकरणाचा उलगडा;१ लाख ५ हजार रुपयांची रोकड जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):धाड (ता. बुलढाणा) येथील करडी फाट्यावर असलेल्या भोंडे पेट्रोल पंपावरून चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची रोख रक्कम अवघ्या काही दिवसांत हस्तगत करत स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याची यशस्वी उकल केली. याप्रकरणी मौंढाळा येथील १९ वर्षीय तरुणाला शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून चोरी झालेला शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.

म्हसला बुद्रुक (ता.जि.बुलढाणा) येथील रहिवासी खंडू संतोषराव भोडे (वय ३७ वर्षे) यांच्या मालकीचा करडी फाट्यावर ‘भोंडे पेट्रोल पंप’ आहे. १५ ते १६ जुलै २०२६ च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने पेट्रोल पंपावरून १ लाख ५ हजार रुपयांची नगदी रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी खंडु भोडे यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल आला होता.

बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या वाढत्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करून आरोपींचा शोध घेणे आणि मुद्देमाल हस्तगत करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांनी तातडीने स्वतंत्र पोलीस पथकाची निर्मिती केली व धाड पोलीस ठाण्याच्या या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड यांच्या पथकाने मौंढाळा (ता. जि. बुलढाणा) येथे सापळा रचून संशयित आरोपी स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय १९ वर्षे) रा. मौंढाळा) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली संपूर्ण नगदी रक्कम १ लाख ५ हजार रुपये हस्तगत करण्यात आली. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!