अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कारवाई सत्र सुरू असून, मद्यधुंद अवस्थेत धोकादायकरीत्या वाहन चालवणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेगाव ग्रामीण, नांदुरा आणि मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण तीन व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.
मद्यधुंद अवस्थेत बुलेट चालवणाऱ्यावर कारवाई
मलकापूर: शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा रोडकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक नियमनाची ड्यूटी करत असताना पोलिसांना एक अनियंत्रित बुलेट एमएच-२८-एपी-८९९९ येताना दिसली. पोलिसांनी चालकाला थांबवून पंचांसमक्ष विचारपूस केली असता, चालकाच्या तोंडून दारूचा तीव्र वास येत असल्याचे आढळले. उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे वैद्यकीय तपासणी केली असता, चालक मद्याच्या अमलाखाली असल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी सरतर्फे रिपोर्टवरून चालकाविरुद्ध मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगाव ग्रामीण : शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून एक तरुणी अचानक घरातून बेपत्ता झाली आहे. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी मिसींगची नोंद केली आहे.
नांदुरा : नांदुरा पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात कौटुंबिक वादानंतर एक महिला घरून निघून गेली आहे. नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेतला, मात्र ती मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून मिसींग नोंद करण्यात आली आहे.
मलकापूर : मलकापूर शहरातून दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेला एक नागरिक वेळेवर घरी परतला नाही. नातेवाइकांनी मित्रपरिवार व परिसरात शोध घेतला, परंतु तो न सापडल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची नोंद करण्यात आली आहे. सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व बिट अमंलदार पुढील तपास व शोध घेत आहेत. बेपत्ता व्यक्तींबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
