बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई; चोरी, अवैध दारू, जुगार व मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई केली. मलकापूर शहरात घरफोडी करून ४९ हजारांचा मुद्देमाल लंपास, तर अवैध दारू विक्री, जुगार आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली आहे.
मलकापूर शहरात घरफोडी
मलकापूर: शहरातील नालंदा नगर परिसरात राहणारे शिक्षक सिद्धार्थ देवचंद झणके हे कुटुंबासह भुसावळ येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा लोखंडी कडी-कोयंडा कापून तसेच चैनल गेट तोडून घरात प्रवेश केला. घरातील हॉल, बेडरूममधील कपाटे व सोफ्याची झडती घेत दोन चांदीचे हार, दोन जोड पैंजण व १२ हजार रोख, असा एकूण ४९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. शेजारील घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
मलकापूरमध्ये दोन मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई
मलकापूर: तहसील चौक परिसरात पोलिसांनी वाहतूक तपासणीदरम्यान राजू रामभाऊ वाकोडे आणि गणेश भिकाजी पाखरे यांना मद्याच्या अमलाखाली वाहन चालविताना पकडले. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ते मद्याच्या अमलाखाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले. दोघांविरुद्ध कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
धाडमध्येही दोन मद्यधुंद चालकांवर गुन्हे
धाड : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान ईश्वर किशोर ससाणे आणि सुखदेव भाऊराव पाडळे हे दोघे मोटारसायकल वेडीवाकडी व निष्काळजीपणे चालविताना आढळले. तपासणीदरम्यान दोघेही मद्याच्या अमलाखाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध कलम १८४, १८५ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
अवैध हातभट्टी दारूविरोधात कारवाई
एमआयडीसी मलकापूर: पोलिसांनी ग्राम भानगुरा येथे शांताराम ओंकार चव्हाण याच्या ताब्यातून ६ लिटर हातभट्टी दारू व प्लास्टिक कॅन, असा ६५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर धामणगाव बढे पोलिसांनी उबाळखेड येथे दीपक सुपडा जारे याच्याकडून १५ लिटर हातभट्टी दारू व कॅन, असा १६०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
रायपूरमध्ये वरली-मटका जुगारावर छापे
रायपूर: पोलिसांनी सैलानी परिसरात केलेल्या दोन कारवायांमध्ये वरली-मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. एका कारवाईत एक हजार २००, तर दुसऱ्या कारवाईत दोन आरोपींकडून एकूण ६,३१० रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
सोनाळा व मलकापूरमध्ये दोन जण बेपत्ता
सोनाळा: पोलीस ठाण्यात रेखा सुरेश तिवारी (वय ३५ वर्षे) या महिलेची मिसिंग नोंद करण्यात आली आहे. ती पिंगळी जहागीर येथून शौचालयास जाते असे सांगून घराबाहेर पडली आणि त्यानंतर परतली नाही.
दरम्यान, मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अमित सदाशिव माळी (वय ३८ वर्षे) याचीही मिसिंग नोंद करण्यात आली आहे. अमित हा शेतीचे पैसे घेण्यासाठी नांदुरा येथे जात असल्याचे सांगून २८ ऑगस्ट रोजी घरातून निघाला होता. सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू असून, घरफोडीतील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!