विषप्राशनाने एकाचा मृत्यू, मारहाण व जुगारावर छापा; दोन जण बेपत्ता

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):मलकापूर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत विविध स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विषप्राशनामुळे एकाचा मृत्यू, थकीत मजुरीवरून मारहाण, सार्वजनिक ठिकाणी जुगार चालवणाऱ्यावर कारवाई, दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा आणि दोन जण बेपत्ता झाल्याच्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
विषप्राशनामुळे विवरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मलकापूर: तालुक्यातील विवरा येथील रहिवासी गजानन नामदेव सांगळकर (वय ४० वर्षे) यांनी विषप्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपचारासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते; परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या बातमीवरून मलकापूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल काेला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निंबोळकर करीत आहेत.
मजुरीचे थकीत पैसे मागणाऱ्या तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला
मलकापूर: चारखंबा चौक परिसरात मजुरीचे थकीत ७ हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या मोहम्मद अबुझर मोहम्मद अक्रम (वय २४ वर्षे) या तरुणाला तिघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी २८ ऑगस्ट रोजी मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीनुसार, अबुझर हे थकीत रक्कम मागण्यासाठी गेले असता आरोपी मोहम्मद शाहरुख याने वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर मोहम्मद अकील व मोहम्मद रइस यांनी मिळून अबुझर यांना मारहाण केली, तर शाहरुख याने लोखंडी पाइपने अबुझर यांच्या गुडघ्यावर व छातीवर प्रहार केले. भांडण सोडवण्यास आलेल्या अबुझर यांच्या आईलाही आरोपींनी शिवीगाळ केली. जखमी अबुझर यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) बीएनएसएस अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास निंबोळकर करत आहेत.
आठवडी बाजारात वरली-मटका जुगारावर पोलिसांचा छापा
मलकापूर: शहरातील आठवडी बाजार परिसरात २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी वरली-मटका जुगार चालवणाऱ्या प्रमोद जगन्नाथ रोडे (वय ४० वर्षे) रा. पंतनगर, मलकापूर याला शहर पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. आरोपीकडून ३५० रुपये रोख, आकडे लिहिलेली चिठ्ठी आणि डॉटपेन जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल योगेश प्रभाकर तायडे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास निंबोळकर करीत आहेत.
दारूच्या नशेत वाकडी-तिकडी दुचाकी चालवणाऱ्यावर कारवाई
मलकापूर: २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तहसील चौक परिसरात दारूच्या नशेत वाकडी-तिकडी दुचाकी चालवून वाहतुकीस धोका निर्माण करणाऱ्या विदेश रामचंद्र पाटील (वय ५१ वर्षे) रा. कुंड खुर्द याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. संशयित वाहनाला थांबवून उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता ते मद्याच्या अंमलाखाली असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर राठोड यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास रोकडे करत आहेत.
मलकापूर तालुक्यातून दोन जण बेपत्ता
मलकापूर ग्रामीण: पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन स्वतंत्र घटनांमध्ये दोघे जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. संजय मुरलीधर पाटील (वय ४७ वर्षे) रा. खडकी हे २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता गुरांचा खुराक आणण्यासाठी मलकापूरला गेले होते, परंतु ते घरी परतले नाहीत. त्यांचा रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच असून त्यांनी पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, गळ्यात रुमाल आणि पायात पॅरागॉन चप्पल घातली आहे. या प्रकरणी मिसिंग दाखल काण्यात आली असून पुढील तपास सुभाष सरकटे करीत आहेत. तर प्रशांत रविंद्र वनारे (वय ३२ वर्षे) रा. माकनेर हे १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेले आहेत. त्यांचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची ५ फूट ३ इंच असून अंगात पांढरा शर्ट, जीन्स पॅन्ट व पांढरे शूज आहेत. या बेपत्ता व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!