अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर शहर व नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध घटनांप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, अपघाती मृत्यू, अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू, तरुणी बेपत्ता/अपहरणाचा संशय, ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेलाड फाट्यावर ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
मलकापूर शहर: फिर्यादी रामभाऊ विश्वनाथ फिरके (वय ६१ वर्षे) रा. अनुराबाद, ता. मलकापूर यांच्या तक्रारीनुसार त्यांचा पुतण्या स्वप्निल लक्ष्मण फिरके (वय ३१ वर्षे) हा १८ सप्टेंबर रोजी सकाळी मोटारसायकलने बेलाड कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जात होता.
बेलाड फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर आरजे-२७-बिडी-१२९२ क्रमांकाच्या १८ चाकी ट्रेलरने मोटारसायकलला धडक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या अपघातात स्वप्निल याच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर प्रथम शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि बेले करीत आहेत.
ध्वनिप्रदूषणप्रकरणी कारवाई; दोन वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन
मलकापूर शहर: पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहेलवान शाहबाबा संदल मिरवणुकीदरम्यान तसेच २२ सप्टेंबर २०२५ रोजी दुर्गादेवी स्थापना मिरवणुकीदरम्यान वाहनावर लावलेल्या डीजेवर कर्कश आवाजात ध्वनीक्षेपण केल्याचे नमूद आहे. निवासी परिसरात ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप असून, यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त पत्राच्या आधारे पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाच्या प्रकरणात कलम १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये आशिष रविंद्र अडकमोल (रा. सरस्वती नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोउपनि अख्तर शेख करीत आहेत.
कॉलेजमधून निघालेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता; तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
मलकापूर शहर: दसरखेड येथील विनोद सोपान एकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पुतणी दिक्षा राजू एकडे (वय २० वर्षे) ही १५ सप्टेंबर रोजी सकाळी कोलते इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर येथे गेली होती. दुपारी सुमारे १ वाजता वडील आजारी असल्याचे सांगून ती कॉलेजमधून निघून गेल्याचे शिक्षकांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. दरम्यान, तिच्याकडून वडिलांच्या मोबाईलवर लग्न केल्याचा व आपण सुखरूप असल्याचा संदेश पाठविण्यात आला. मात्र, १८ सप्टेंबर रोजी तिने नातेवाईक महिलेला फोन करून रडत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिच्या व्हॉट्सॲप डीपीमध्ये अक्षय विठ्ठल चिकटे (रा. वडोदा, ता. मलकापूर) याच्यासोबतचा फोटो असल्याचे आढळून आल्याने तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे करीत आहेत.
तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त
मलकापूर शहर: उर्दू शाळेसमोर, मुक्ताईनगर रोड परिसरात पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई केली. यावेळी सैय्यद हसन सैय्यद रऊफ (वय ४४ वर्षे) रा. कुरेश नगर, पारपेठ, मलकापूर याच्याकडून गुलाब तंबाखूच्या २९ पुड्या, गाय छाप तंबाखूच्या १७ पुड्या आणि उंट बिडीचे ९ बंडल, असा एकूण ४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी कलम ७, २४ सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम, २००३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे करीत आहेत.
कोलासर फाट्यावर अज्ञात वाहनाची धडक; तरुणाचा मृत्यू
नांदुरा: फिर्यादी निलेश जनार्दन वाघ यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मनिष जनार्दन वाघ (वय ३५), रा. यडी, ता. नांदुरा हा १३ मे २०२६ रोजी कामासाठी एनएच-५३ वरील कोलासर फाट्याकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने मनिष यांच्या मृत्यूस वाहनचालक कारणीभूत ठरल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या घटनेची सुरुवातीला मर्ग चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी व पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम १०६, २८१ अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार नवाज शेख करीत आहेत.
