अजय टप
शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शेगाव शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोचिंग क्लास संपवून घरी परतणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, तिचा हात धरून विनयभंग केल्याची आणि नकार दिला असता तिला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रची घटना घडली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी पलाश संजय देशमुख याच्याविरुद्ध ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘पोक्सो’ कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, फिर्यादी कुमारी तन्वी (नाव बदलले आहे – वय १७ वर्ष, व्यवसाय: शिक्षण), रा. महेश नगर, रोकडीया नगर, शेगांव ही मुलगी शेगाव शहरातील एका खाजगी क्लासमध्ये ट्रेडिंगचे शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे दिनांक १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ती आपले क्लास संपवून घराच्या दिशेने पायी जात होती. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ती नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचली असता, आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या पलाश संजय देशमुख (वय २४ वर्ष, रा. रोकडीया नगर, शेगाव) या आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. आरोपीने तिला मागून आवाज देऊन थांबवले. पीडित मुलगी थांबली असता, आरोपी पलाश देशमुख याने अत्यंत वाईट उद्देशाने तिचा उजवा हात जबरदस्तीने पकडला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर तिला म्हणाला, तू मला खूप आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड घाबरली. तिने प्रसंगावधान राखून स्वतःचा हात झटकायला आणि तिथून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा नकार पाहून आरोपीचा पारा चढला आणि त्याने पीडितेला तू माझ्याशी बोलली नाहीस किंवा माझ्याशी लग्न केले नाहीस, तर तुला आणि तुझ्या भावाला मी जिवाने मारून टाकेन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे पीडिता पूर्णपणे हादरून गेली. तिने तिथून कशीबशी सुटका करून घेत थेट आपले घर गाठले आणि घडलेला सर्व आपबिती आपल्या पालकांना सांगितली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी रात्रीच शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपीविरुद्ध लेखी तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५, ७८, आणि ३५१ (२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे हे करीत आहेत. या घटनेमुळे शेगाव शहरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, अशा रोडरोमियो आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर पोलिसांनी कठोर वचक ठेवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
