बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा खळबळ! जळगाव जामोद आणि मोताळातून दोन तरुण मुली बेपत्ता

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्हाभरातून चिंता वाढवणारी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अवघ्या २४ तासांच्या आत जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दोन तरुण मुली घरातून अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत ‘पिंपळगाव काळे’ येथे घडली असून, दुसरी घटना बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत ‘मोताळा’ येथे घडली आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलीस स्टेशनमध्ये मिसींग’ दाखल करण्यात आली आहे.

🎯आई घरात असतानाच मुलीने बाहेरून कडी लावली अन्…!

जळगाव जामोद: तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून २७ वर्षीय तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी तिच्या आईने जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तरुणी आणि तिची आई या दोघीच पिंपळगाव काळे येथील राहत्या घरी होत्या. घरात दुसरं कोणीही नसल्याचा फायदा घेत, मुलीने ती राहत असलेल्या घराचे लाकडी दरवाजा बाहेरून बंद केला आणि कोणालाही काहीही न सांगता ती घरातून निघून गेली. आईने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही, अखेर रात्री १०.३२ वाजता जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोउपनि अमोल पंडित करीत आहेत.

🎯 आई मजुरीवरून घरी परतली, दार उघडे होते पण मुलगी गायब!

मोताळा: दुसरी चिंताजनक घटना बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोताळा शहरातील वृंदावन नगर येथे घडली आहे. येथील २१ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या आईने बोराखेडी पोलीस ठाण्यात मुलीचा शोध घेण्याबाबत तोंडी रिपोर्ट दिला असून, पोलिसांनी मिसींग दाखल केली आहे.

यातील फिर्यादी या नेहमीप्रमाणे दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मजुरीच्या कामावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी ही घरीच होती. दुपारच्या सुमारास, म्हणजेच १.३० वाजताच्या सुमारास जेव्हा आई काम करून घरी परत आली, तेव्हा त्यांना घराचे मुख्य दार उघडे दिसले. त्यांनी घरात जाऊन मुलीला आवाज दिला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी घरात आणि वृंदावन नगरच्या आजूबाजूला शोध घेतला. नातेवाइकांकडेही चौकशी केली, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. ती कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची खात्री पटल्यानंतर आईने पोलिसांत धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार अशोक आडोकार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!