काळाचा घाला: निळेगाव फाट्यावर ट्रॅक्टर उलटला; आबाद नगरच्या कुटुंबाचा आधार हरपला

अजय टप

खामगाव (प्रतिनिधी): नशिबाचे फासे कधी आणि कसे उलटतील याचा नेम नसतो. रविवारी सकाळच्या सुमारास निळेगाव फाट्यावर नियतीने असाच एक क्रूर डाव साधला. कामाच्या निमित्ताने घरून निघालेल्या एका कष्टाळू बापाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बाळापूर तालुक्यातील आबाद नगर परिसरात शोककळा पसरली असून, एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, विनोद रामकृष्ण वाकोडे (वय ५५ वर्षे, रा. आबाद नगर, बाळापूर) हे आपल्या उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर घेऊन खामगाव परिसरातील रामनगर शिवारात आले होते. १९ एप्रिल २०२६ च्या सकाळी ९.३५ वाजताच्या सुमारास, निळेगाव फाट्याजवळून जात असताना अचानक ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि काही क्षणातच तो महाकाय ट्रॅक्टर पलटी झाला. दुर्दैवाने, विनोद वाकोडे हे ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेले. अपघात इतका भीषण होता की, मदतीसाठी लोक धावून येईपर्यंत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी मोठ्या आशेने त्यांना तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्यांना ‘मृत’ घोषित केले. दवाखान्याच्या आवारात नातेवाईकांचा टाहो पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. डॉ. निमजे यांच्या वतीने कक्ष सेवक विलास वडोदे यांनी पोलीस स्टेशनला ओपीडी मेमो सादर केला असून पोलिसांनी अपघाताची अधिकृत नोंद केली आहे. पुढील तपास बाळकृष्ण फुंडकर हे करीत आहेत.

कष्टाळू हातांचा करुण अंत

विनोद वाकोडे हे आपल्या कुटुंबाचा मुख्य आधार होते. शेतात राबून आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कष्ट करून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. “सकाळी घराबाहेर पडताना ते संध्याकाळी परत येतील आणि मुलाबाळांसोबत जेवतील,” अशी आशा असलेल्या कुटुंबाला आता केवळ त्यांच्या आठवणींच्या साहाय्याने जगावे लागणार आहे. एका अपघाताने एका पत्नीचे कुंकू पुसले, तर मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हिरावून नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!