अजय टप
जळगाव जामोद,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात काल रात्री पोलिसांच्या पथकाने एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरातल्या कुरेशी मोहल्ला परिसरातील एका वाडग्यामध्ये अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे, गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तब्बल १७ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या जनावरांची एकूण किंमत ३ लाख ४५ हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, कुरेशी मोहल्ला भागात गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर जनावरे आणून ठेवण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक विशेष पथक तयार करण्यात आले. १९ मे २०२६ रोजी रात्री ठीक ८ वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने कुरेशी मोहल्ला येथील रहिवासी आरोपी शेख शेरा शेख युसुफ याच्या मालकीच्या वाडग्यावर अचानक छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळ काढला. पोलीस पथकाने वाडग्यात प्रवेश केला असता, आरोपी शेख शेरा याने सर्व जनावरांना अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे दोरीने बांधून ठेवले होते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसांत या मुक्या प्राण्यांना खाण्यासाठी साधा चारा किंवा पिण्यासाठी पाणीही देण्यात आले नव्हते. जनावरांची अवस्था पाहून पोलीस पथकाने तात्काळ स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जनावरांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांचा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केला. पोलिसांनी घटनास्थळावरून तांबड्या रंगाचे लहान गोरे, पांढऱ्या रंगाचा लहान गोरा, तांबड्या रंगाचे मोठे बैल, पांढऱ्या रंगाचे मोठे बैल, असा एकूण १७ गोवंश (किंमत ३ लाख ४५ हजार रुपये) जप्त केले आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार संजय वेरुळकार यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, कलम ५ (क), ९ (अ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, कलम ११ (१) (ज) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार इरफान शेख हे करीत आहेत. ही धडक कारवाई जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांनी केली.
गोपाल कृष्ण गोरक्षण येथे जनावरांना जीवदान
पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व १७ जनावरांना रात्रीच सुखरूपपणे जळगाव जामोद येथील “गोपाल कृष्ण गोरक्षण” केंद्रात जमा केले आहे. गोरक्षण प्रशासनाने जनावरांचा ताबा घेऊन त्यांना तात्काळ चारा आणि पाण्याची सोय करून दिली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे १७ मुक्या प्राण्यांचे प्राण वाचल्याने स्थानिक पशुप्रेमी आणि नागरिकांमधून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.
