अजय टप
मलकापूर(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत महिला व तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत नांदुरा तालुक्यातील एका गावात घडली असून, यामध्ये एक १८ वर्षीय तरुणी दुकानातून घरगुती सामान आणायला जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे. तर दुसरी घटना मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत शहरातून समोर आली असून, येथे एक ३९ वर्षीय विवाहिता कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ‘मिसिंग’ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
बोराखेडी: नांदुरा तालुक्यातील एका गावाची रहिवासी असलेली १८ वर्षीय तरुणी दिनांक २० मे २०२६ रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिच्या आईने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या महिला (वय ४२ वर्षे, व्यवसाय- शेती) यांची १८ वर्षीय मुलगी २० मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून “मी दुकानातून बिस्किटाचा पुडा घेऊन येते,” असे सांगून निघाली होती. मात्र, बऱ्याच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. मुलीला घरी येण्यास उशीर झाल्याने कुटुंबीयांनी तिची गावात आणि आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली. नातेवाईकांकडेही तिचा शोध घेण्यात आला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची रीतसर माहिती देण्यात आली. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुपडसिंग चव्हाण हे करीत आहेत.
मेहकर: दुसरी घटना मेहकर शहराच्या एका रहिवासी परिसरातून समोर आली आहे. येथील एक ३९ वर्षीय विवाहिता आपल्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
मेहकर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने (वय ४६ वर्षे, धंदा- मजूरी) यांनी मेहकर पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार, त्यांची पत्नी (वय ३९ वर्षे) ही १९ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेली. संध्याकाळपर्यंत ती घरी न परतल्याने पती आणि नातेवाईकांनी तिची सर्वत्र शोधशोध सुरू केली. मेहकर शहर, आजूबाजूची गावे आणि सर्व नातेवाईकांकडे विचारपूस करूनही तिचा कोणताही सुगावा लागला नाही. अखेर २० मे रोजी दुपारी पतीने मेहकर पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सदानंद चापले हे करीत आहेत.
