अजय टप
धामणगाव बढे (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित अन्नपदार्थांविरुद्ध आपली आक्रमक मोहीम अधिक तीव्र केली आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे जामनेर रोडवरील एका स्वीट एजन्सीसमोर छापा टाकून, बेकायदेशीररीत्या सुगंधी आणि प्रतिबंधित सुपारीची विक्री करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त नितीन महादेवराव नवलकार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास ‘पटेल स्वीट एजन्सी’ समोर सापळा रचला. यावेळी आरोपी मो. जुबेर मो. हारून पटेल (वय ३२ वर्ष) हा दोन पिशव्यांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असताना पथकाच्या नजरेस पडला. FDA च्या पथकाने आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून केसरी नखराली स्वीट सुपारी (५ रु. पाकीट): ३८ सिल्ड पॅकेट (किंमत २,२८० रुपये), केसरी नखराली स्वीट सुपारी (१ रु. पाकीट): २२ सिल्ड पॅकेट (किंमत १,३२० रुपये), चंचल इलायची सुपारी: ३ सिल्ड पॅकेट (किंमत १८० रुपये), असा एकूण ३ हजार ७८० रुपयांचा प्रतिबंधित साठा पोलिसांनी आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आहे. रकमेचा आकडा लहान दिसत असला, तरी यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिताचे कलम १२३, २७४, २७५, २२३, अन्न सुरक्षा कायदा कलम २६ (२) (i), २६ (२) (iv), २७ (२) (e) (f), ३० (२) (a) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बरारकर हे करत आहेत. हा साठा नेमका कुठून आला? याचा मुख्य सूत्रधार कोण आहे? आणि जिल्ह्यात अजून कुठे कुठे हा माल पुरवला जातो, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.