‘खाकी’च्या चातुर्यापुढे गुन्हेगार नतमस्तक; अरबाज खान खून प्रकरणाचा थरारक उलगडा; मुंब्रा पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी!

मुंब्रा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): कायद्याचे हात किती लांब असतात आणि ‘खाकी’ वर्दीतली जिद्द काय असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंब्रा पोलिसांनी दिला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेताना समोर आलेले खुनाचे भीषण वास्तव आणि अत्यंत क्लिष्ट अशा गुन्ह्याचा लावलेला छडा, यामुळे सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुंब्रा पोलिसांचा ‘उदो उदो’ केला जात आहे. केवळ तांत्रिक पुराव्यांच्या धाग्यावरून हत्येच्या कटापर्यंत पोहोचणाऱ्या मुंब्रा पोलिसांच्या या कामगिरीने गुन्हेगारी जगतात धडकी भरली आहे.
दिनांक ३ मे २०२६ रोजी मुंब्रा परिसरात राहणारा २२ वर्षीय अरबाज मकसूद अली खान हा कामाचे पैसे आणण्यासाठी दादरला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. वडिलांनी सर्वत्र शोध घेऊनही अरबाजचा पत्ता न लागल्याने त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद मिसिंग म्हणून करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण साधे बेपत्ता होण्याचे नसून यामागे काहीतरी गंभीर कट असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी ताडले.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोउपनि सावंत आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. बेपत्ता अरबाजच्या मोबाईल क्रमांकाचे ‘कॉल डिटेल्स’ आणि तांत्रिक विश्लेषण केले असता, पोलिसांना पहिला मोठा धागा मिळाला. अरबाजचे शेवटचे लोकेशन वसईतील भोईदावाडा परिसरात दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच दिवशी अरबाजची प्रेयसी ‘मेहजबीन’ हिचे लोकेशनही त्याच परिसरात होते.
पोलिसांनी संशयाच्या आधारे मेहजबीनला पोलीस ठाण्यात बोलावले. सुरुवातीला तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी जेव्हा तपासाचा फास आवळला आणि तांत्रिक पुरावे समोर ठेवले, तेव्हा तिचे अवसान गळाले आणि तिने खुनाच्या भीषण कटाची कबुली दिली.
प्रेयसीनेच रचला होता प्रियकराच्या मृत्यूचा सापळा
मेहजबीनने दिलेल्या माहितीनुसार, हा केवळ रागातून झालेला खून नव्हता, तर तो एक सुनियोजित कट होता. मेहजबीनने तिचा पती हसन, भाऊ तारीक आणि मित्र मुज्जूम पठाण यांच्या मदतीने अरबाजला वसईत बोलावले होते. तिथे त्यांनी अरबाजकडे खंडणीची मागणी केली. मात्र, अरबाजकडे पैसे नसल्याने आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठला. त्यांनी अरबाजचे हातपाय बांधून त्याला प्लास्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अरबाजचा जागीच मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी अरबाजचा मृतदेह एका हिरव्या रंगाच्या ड्रममध्ये भरला आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्जन स्थळी असलेल्या नाल्यात फेकून दिला.
नाल्यातून शोधला मृतदेह
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख आणि पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी तातडीने वालीव परिसरात शोधमोहीम राबवली. आरोपी मोहम्मद तारीक याला ताब्यात घेऊन त्याने दाखवलेल्या जागेवरून पोलिसांनी तो ड्रम आणि अरबाजचा मृतदेह ताब्यात घेतला. दुर्गम भागात आणि नाल्यात टाकलेला मृतदेह शोधून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, ठाणे पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, कळवाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे (ढाकणे) यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे आणि तपासाच्या सूक्ष्म निरीक्षणा मुळेच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद कुंभार, पोउपनि विनायक माने, अंबादास सावंत, पोलीस अंमलदार प्रदीप कांबळे, रतिलाल वसावे, संतोष गायकवाड, सुनील आव्हाड, गणेश सपकाळे, अण्णासो एडके, शंकर वारकड, अजित चव्हाण, भरत हारुगले आणि सूर्यवंशी यांनी ही लीलया पेलत
आरोपींच्या मुसक्या आवळल्या. केवळ आरोपींना पकडले नाही, तर भारतीय न्याय संहिताच्या कलम १४०, ३(५), १०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवून दिला.
तरुणाला मिळाला न्याय
सध्या मुख्य आरोपी मेहजबीन आणि तिचा भाऊ तारीक पोलिसांच्या कोठडीत आहेत, तर फरार आरोपी हसन आणि मुज्जूम यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मुंब्रा पोलिसांच्या या तत्परतेमुळे एका तरुणाला न्याय मिळाला आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला आणि त्याने पुरावे नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी मुंब्रा पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकत नाही, हेच या कारवाईतून सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!