अजय टप
खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):कौटुंबिक वादातून मार्ग काढण्यासाठी माहेरचा आधार शोधणाऱ्या एका २० वर्षीय विवाहितेचे गूढरीत्या बेपत्ता होणे, ही घटना गारडगाव परिसरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही तरुणी आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास होती, मात्र अचानक ती बेपत्ता झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर विवाहिता ही अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून, तिचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही काळापासून सासरच्या मंडळींशी असलेल्या मतभेदांमुळे आणि वादविवादांमुळे ती मानसिक तणावाखाली होती. याच कलहातून तात्पुरती सुटका मिळावी आणि मनःशांती लाभावी, या उद्देशाने ती खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे आपल्या मामांच्या घरी राहण्यास आली होती. मागील एक महिन्यापासून ती आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. नवीन वातावरणात राहून ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
दिनांक १२ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास, नेहमीप्रमाणे घरात वावरत असताना तिने ‘शौचास जाऊन येते’ असे सांगून घराबाहेर पाऊल टाकले. दुपारची वेळ असल्याने सुरुवातीला कुणाच्याही मनात शंकेची पाल चुकचुकली नाही. मात्र, बराच वेळ उलटूनही जेव्हा ती घरी परतली नाही, तेव्हा नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नातेवाईकांनी तात्काळ गाव परिसर, ओळखीचे लोक आणि आजूबाजूच्या गावांमध्ये तिचा शोध सुरू केला. ज्या अकोला जिल्ह्यातील मूळ गावाहून ती आली होती, तिथेही संपर्क साधण्यात आला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा कुठेही पत्ता लागला नाही. दोन दिवस सर्व स्तरावर शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने, अखेर तिच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ‘मिसिंग’ (गहाळ) झाल्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
संवेदनशीलतेची गरज
आजच्या धावपळीच्या युगात कौटुंबिक कलह आणि त्यातून निर्माण होणारे मानसिक दडपण ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. सासर-माहेरच्या वादात होरपळणारी तरुण पिढी कधीकधी टोकाची पावले उचलते किंवा नैराश्यातून घर सोडते. अशा वेळी कुटुंबाने आणि समाजाने अशा व्यक्तींना मानसिक आधार देणे गरजेचे असते. सदर विवाहितेच्या बेपत्ता होण्यामागे नेमके काय कारण आहे? ती स्वतःहून कुठे निघून गेली की तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला? हे अद्याप अस्पष्ट आहे.
