तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे आचरण करावे – यशवंतदादा गोसावी 

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):तरुणांसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तित्व आचरणीय व्यक्तिमत्व असून चरित्र संपन्न व निर्व्यसनी राहुन राष्ट्राच्या प्रगतीसाठी सक्रिय राहावे असे प्रतिपादन प्रख्यात शिवव्याख्याते यशवंतदादा गोसावी यांनी आयोजित छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी केले.

परिसरातील समस्त शिवशंभु पाईक समितीच्या माध्यमातून तरुणांनी एकत्रित येऊन छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा “रयतोत्सव” म्हणून साजरा करावा,अशा उद्देशाने चांडक विद्यालयाचे सभागृह तथा पटांगणात विविध उपक्रमांचे आयोजन करीत भव्य अशा सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये पहिल्या दिवशी महेश पवार यांच्या संकल्पनेतून महाराजांच्या इतिहासाची प्रचिती देणारे गडकिल्ले, तर संतोष चंदने यांच्या संकल्पनेतून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, आरमार अशा आदींची प्रदर्शनी साकारण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी १९४ गड किल्ले पदाक्रांत केलेल्या ८ वर्षाची दुर्ग वीरांगणा कुमारी शर्विका म्हात्रे या शिवकन्येचा सत्कार त्या नंतर शाहीर स्वप्निलदादा डुमरे यांचा पोवाडा तथा प्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंतदादा गोसावी यांच्या शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सोहळ्याच्या सुरुवातीला शहरातील पवन तरकासे सर यांच्या विद्यार्थ्यांच्या चमूने सुंदर असे महाराष्ट्रात संस्कृतीला अनुसरून नृत्य सादर केले. तर रुद्र वैष्णव याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सादर करीत इतर सहकाऱ्यांसोबत महाराजांच्या विशेष घटनाक्रमांचे प्रतिकात्मक देखावे सादर केले. त्यानंतर शाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या चमूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित सुंदर असा पोवाडा आपल्या विशेष शैलित सादर केला. त्यानंतर दुर्ग वीरांगणा शिवकन्या शर्विका म्हात्रे हिचा पालकांसह यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. तर प्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत दादा गोसावी यांचे व्याख्यान झाले. यामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे फक्त पराक्रमीच नव्हते तर ते विद्वानही होते. त्यांचे अनेक विषयांसह विविध भाषांवर प्रभुत्व होते. ते चरित्र संपन्न तथा सुसंस्कृत गुणसंपन्न व्यक्तिमत्व होते. आजच्या तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानून त्यांचे आचरण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. सोबतच नील कल्याणकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेत श्रीराम प्रतिष्ठान ढोल पथक च्या पारंपरिक वाद्यातून संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची घटनाक्रम सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सुंदर असे संचलन बुलढाणा येथील रिंढे सर यांनी केले तर आभार समस्त शिवशंभु पाईक यांच्यातर्फे करण्यात आले. हा भव्य दिव्य रयतोत्सव सोहळ्यामध्ये परिसरातील राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा पुरुष व महिला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. यशस्वी आणि देखण्या कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.या सोहळ्याच्या यशस्वी ते करिता समस्त शिवशंभु पाईक तरुणांनी आता परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!