अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवी संस्थान घाटपुरी मंदिरातील धाडसी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांसमोर आव्हान ठरलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगट जप्त करण्यात आली आहे.
खामगाव येथील ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवी संस्थान घाटपुरी येथे २४ डिसेंबर २०२५ च्या रात्री नऊ वाजेपासून ते २५ डिसेंबर २०२५ च्या पहाटे सहा वाजेच्या दरम्यान एक धाडसी चोरीची घटना घडली होती. एका अज्ञात चोरट्याने मंदिराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने तेथील मुख्य आराध्य दैवत असलेल्या देवी आणि गणपतीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. सुरुवातीच्या तक्रारीनुसार या दागिन्यांची अंदाजे किंमत ७३ हजार रुपये एवढी सांगण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण खामगाव शहरासह जिल्हाभरातील भाविकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धार्मिक स्थळावरील या चोरीच्या घटनेची गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंभोरे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे, पोलीस अंमलदार, अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खार्डे, शिवानंद हेलगे, कैलास ठोंबरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक खबऱ्यांकडून माहिती काढली. एका संशयित इसमाची हालचाल आणि त्याच्याकडे असलेल्या सोन्याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोल्याचा शातीर आरोपी अमोल तेलगोटे रा.रिधोरा (जि.अकोला) याला गजाआड केले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने घाटपुरी मंदिरात केलेल्या चोरीची कबुली दिली. सोबतच मंदिरातून चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवून त्याने त्याची बनवलेली लगट (किंमत ३ लाख २० हजार रुपये) पोलिसांच्या स्वाधीन केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
जनतेतून पोलिसांचे कौतुक आणि आभार
घाटपुरी येथील जगदंबा देवी मंदिर हे परिसरातील हजारो नागरिकांचे आराध्य दैवत आहे. तिथे झालेली चोरी ही केवळ पैशांची किंवा दागिन्यांची चोरी नव्हती, तर ती भाविकांच्या श्रद्धेवर झालेला आघात होता. हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे खामगाव शहरासह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी आणि मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
