जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयात लाचेचा ‘मोजणी’ कार्यक्रम; दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!; प्रशासकीय खुर्च्यांवर बसलेले पांढरपेशी ‘दरोडेखोर’ की जनतेचे सेवक? जळगाव जामोदमध्ये भ्रष्टाचाराचा महापूर!

अजय टप

जळगाव जामोद,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): ज्या विभागावर जमिनीचे पारदर्शक मोजमाप करण्याची जबाबदारी आहे, त्याच ‘भूमी अभिलेख’ कार्यालयात सध्या भ्रष्टाचाराचे ‘सीमांकन’ मोजले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी एका सामान्य नागरिकाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना दोन वर्ग-३ च्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल आणि भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली असून, प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

तक्रारदार गौरव नरेश राठी यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जुन्या जागेचे सीमांकन आणि मोजणी करून हवी होती. नियमानुसार सरकारी शुल्क भरल्यानंतर हे काम होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी पगार घेऊनही ज्यांची भूक भागत नाही, अशा विश्वजीत विनायक सोनोने (वय ५३ वर्षे) पद: परिरक्षण भूमापक) आणि सचिन सदाशिव वाजपे (वय ४८ वर्षे) पद: मुख्यालय सहायक या जोडगोळीने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सरकारी कार्यालयात बसून जनतेची अडवणूक करायची आणि ‘पाकीट’ मिळाल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही, हा जणू या कार्यालयाचा अलिखित नियमच बनला आहे. मात्र, तक्रारदाराने भ्रष्टाचारापुढे न झुकता थेट एसीबी बुलढाणा यांच्याकडे धाव घेतली.

सापळा रचला आणि ‘साहेबांचा’ माज उतरला!

१२ मे २०२६ रोजी दुपारी १.३० ते ४ च्या दरम्यान जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जणू ‘व्यवहाराचा’ बाजार भरला होता. एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात, विश्वजीत सोनोने याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारले. शासकीय कक्षातच हा काळाबाजार सुरू असताना पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने झडप घातली आणि लाचखोर आरोपी विश्वजीत विनायक सोनोने (परिरक्षण भूमापक), सचिन सदाशिव वाजपे (मुख्यालय सहायक). या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि विलास गुसिंगे हे करत आहेत.

प्रशासनाचे फुटले वाभाडे: खुर्च्या सरकारी, वृत्ती मात्र ‘बाजारी’!

या घटनेने जळगाव जामोद तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेचा खरा चेहरा समोर आणला आहे. सामान्य माणूस आपल्या हक्काच्या कामासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवतो, मात्र तिथे बसलेले हे ‘पांढरपेशी भामटे’ सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचे काम करत आहेत. वर्ग-३ च्या या पदावर काम करणाऱ्या सोनोने आणि वाजपे यांना सरकार दरमहा हजारो रुपये पगार देते. मग तरीही सामान्य जनतेच्या खिशात हात घालताना यांना शरम वाटत नाही का? वयाच्या ५३ व्या वर्षी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सोनोने यांची भ्रष्टाचाराची भूक शमलेली नाही, हे दुर्दैव!

भूमी अभिलेख विभाग की ‘वसुली’ केंद्र?

जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तारखांवर तारखा दिल्या जातात. मात्र, जर ‘चिरीमिरी’ दिली तर तीच फाईल विमानापेक्षा वेगाने धावते. हा भ्रष्टाचार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालतो की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कायद्याचा धाक उरलाय कुठे?

भरदिवसा, स्वतःच्या कार्यालयात बसून लाच घेण्याचे धाडस होतेच कसे? याचा अर्थ असा की, प्रशासनात भ्रष्टाचाराची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की, यांना कायद्याची किंवा एसीबीची कोणतीही भीती उरलेली नाही. लाचखोरांची केवळ बदली नको, तर त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

साहेब, ही तर फक्त ‘टीप ऑफ द आईसबर्ग’ आहे!

एसीबीने पकडलेले हे दोन अधिकारी म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. जळगाव जामोदच्या भूमी अभिलेख कार्यालयात अशा अनेक ‘सोनोने’ आणि ‘वाजपे’ प्रवृत्ती दडलेल्या आहेत. या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले असले, तरी जोपर्यंत व्यवस्थेतील ही कीड मुळासकट उपटली जात नाही, तोपर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही. बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे या धडाकेबाज कारवाईबद्दल कौतुक होत असले, तरी आता गरज आहे ती अशा कार्यालयांचे ऑडिट करण्याची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!