बुलढाणा क्राईम डायरी: कुठे कर्जापायी आत्महत्या, तर कुठे क्षुल्लक वादातून रक्तरंजित हाणामारी; जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था ऐरणीवर!

अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गेल्या २४ तासांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत आत्महत्या आणि हाणामारीच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने एका तरुण शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले, तर साध्या कारणावरून एकमेकांचे डोके फोडण्यापर्यंत नागरिकांची मजल गेली आहे. या घटनांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोरखेडी: शेती कर्जाच्या विळख्यात तरुणाची आत्महत्या
मोताळा तालुक्यातील तालखेड शिवारात एका ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश आकार सपकाळ असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशने शेतीसाठी आणि इतर कामांसाठी कर्ज घेतले होते. कर्जाचा बोजा वाढत गेल्याने तो मानसिक तणावात होता. ८ मे रोजी सकाळी चंपालाल कलाळ यांच्या शेतातील गोधनीच्या झाडाला त्याने गळफास घेतला. १०-१५ ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर येथे पाठवण्यात आला. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, तपास पोलीस अंमलदार दिलीप तडवी हे करत आहेत. एका तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शेगाव, धाड आणि धामणगाव बढे: जुन्या वादातून जीवघेणे हल्ले
शेगाव शहर: वर्ध्याहून दर्शनासाठी आलेल्या विजय लोहवे या तरुणावर श्री टाकीज चौकात ओळखीच्याच गजानन पारधी आणि गोपाल थोरात यांनी हल्ला केला. डोक्यावर आणि डोळ्यावर गंभीर जखमा झाल्या असून, शेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धाड (करडी फाटा): जुन्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मनोज हागे याने फिर्यादी प्रवीण गाढवे यांच्या डोक्यात ‘धातूच्या कड्याने’ प्रहार करून गंभीर जखमी केले. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.
धामणगाव बढे (चार्वदा): दारूच्या नशेत राजू खराटे आणि त्याच्या चार साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी देवीदास खराटे यांच्यावर दगडांनी हल्ला केला. या राड्यात फिर्यादीसह साक्षीदारही जखमी झाले आहेत.
शिवाजीनगर आणि पिंपळगाव राजा: कौटुंबिक आणि क्षुल्लक वादांचे पर्यवसान
खामगाव (शिवाजीनगर): “माझ्या मुलाला भेटू नको” असे म्हटल्याच्या कारणावरून शिवानी देशमुख आणि अर्चना देशमुख यांनी घरात घुसून धुमाकूळ घातला. फिर्यादी मनकर्णा घ्यार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी केवळ शिवीगाळच केली नाही, तर २० हजार रुपये किमतीचे ‘लॅब्राडोर’ जातीचे कुत्र्याचे पिल्लूही जबरदस्तीने पळवून नेले. स्वतः विष पिऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही यावेळी देण्यात आली.
पिंपळगाव राजा: गाडी बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून हिवरा बु. येथे दोन गटात राडा झाला. अरविंद हेलोडे आणि त्याच्या साथीदारांनी एका महिलेचे केस धरून तिला मारहाण केली. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खामगाव: अपघातात मृत्यू आणि रस्ते सुरक्षा
पळशी बुद्रुक शिवार: दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात श्रीकृष्ण केसकर (वय ६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.
वाघळी फाटा: एका ५०-५५ वर्षीय अनोळखी इसमाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, वाहन चालक फरार झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे.
नांदुरा: पैशांच्या वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी
शेलगाव मुकुंद येथे ट्रॅक्टरच्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पुतण्याने चुलत्यालाच काठीने बेदम मारले. देविदास चव्हाण यांनी आपल्या कामाचे पैसे मागितले असता, उमेश आणि जितेंद्र चव्हाण यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
संयम हरवलेला समाज?
जिल्ह्यात घडलेल्या या सर्व घटनांकडे पाहिल्यास, लोकांमध्ये संयमाचा अभाव दिसून येत आहे. किरकोळ वाद, पैशांचे व्यवहार आणि जुनी भांडणे मिटवण्यासाठी कायद्याचा आधार घेण्याऐवजी लोक हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत. पोलिसांनी या सर्व प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे. मात्र, ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता आणि कर्जाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!