धक्कादायक! नाफेडचा १५ लाखांचा हरभरा लंपास; ट्रक चालकाने केला विश्वासघात

मोताळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):शेतकऱ्यांच्या मालाची सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी असलेल्या एका ट्रक चालकाने चक्क १५ लाख ८६ हजार रुपयांच्या हरभऱ्याचा अपहार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नाफेड सेंटरवरून वखार महामंडळाकडे निघालेला ट्रक नियोजित स्थळी न पोहोचवता चालकाने माल लंपास केल्याने मोताळा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बोरखेडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोहिणखेड (ता.मोताळा) येथील रहिवासी असलेले राजेंद्र आनंदराव जगले (वय ५२ वर्षे) रा.रोहणखेड (ता. मोताळा), हे ‘संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी’चे अध्यक्ष आहेत. या कंपनीमार्फत लालमाती (किन्होळा) येथे नाफेडचे खरेदी केंद्र चालवले जाते. या केंद्रावर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल साठवणुकीसाठी शासकीय वखार महामंडळ, मलकापूर येथे पाठवला जातो. ९ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास, लकी ट्रान्सपोर्ट, मोताळा यांच्यामार्फत हरभरा भरण्यासाठी ट्रक क्रमांक एमएच-४३-यू-५२९० हा लालमाती येथील नाफेड सेंटरवर आला होता. या ट्रकमध्ये एकूण २७० क्विंटल हरभरा (५० किलोचे ५४० कट्टे) भरण्यात आला. या मालाची सरकारी हमीभावाप्रमाणे एकूण किंमत १५ लाख ८६ हजार २५० रुपये इतकी होती.
वखार महामंडळाऐवजी ट्रक गायब
फिर्यादी राजेंद्र जगले यांनी हा मौल्यवान माल सुरक्षितपणे वखार महामंडळ, मलकापूर येथे पोहोचवण्यासाठी ट्रक चालक शेख आमीन शेख जमील (वय ३३ वर्षे) रा. पारपेठ परिसर, मलकापूर याच्या स्वाधीन केला. मात्र, आरोपी चालकाने तो माल वखार महामंडळात जमा न करता, वाटेतच कुठेतरी नेऊन त्याची विल्हेवाट लावली किंवा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला. ११ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत माल वखार महामंडळात पोहोचला नसल्याचे लक्षात आल्यानंतर, फिर्यादी यांनी शोधाशोध केली. मात्र ट्रक आणि चालक दोघांचाही पत्ता लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगले यांनी बोरखेडी पोलीस स्टेशन गाठले.
राजेंद्र जगले यांच्या तक्रारीवरून बोरखेडी पोलिसांनी आरोपी ट्रक चालक शेख आमीन शेख जमील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१६ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बोरखेडी पोलीस करत आहेत. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याच्या मुसक्या कधी आवळतात आणि चोरीला गेलेला १५ लाखांचा हरभरा हस्तगत होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!