‘ट्रिपल तलाक’च्या गुन्ह्याचे जळगाव जामोदमध्ये खळबळ; “मुलगा होत नाही” म्हणून पत्नीला भरचौकात सोडले!

अजय टप

जळगाव जामोद, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): समाजात महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जात असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. “तुला फक्त मुलीच होतात, आम्हाला मुलगा पाहिजे,” असे म्हणत छळ करणाऱ्या नराधम पतीने आपल्या पत्नीला सार्वजनिक ठिकाणी ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणत घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथील सासर असलेल्या २२ वर्षीय सायमाबाई याकुब शहा या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे लग्न जोहार नगर (बुलढाणा) येथील याकुब शहा युसुफ शहा याच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच सायमाबाई यांच्या नशिबी छळ आला. त्यांना मुली झाल्याचा राग मनात धरून पती याकुब शहा आणि सासरा युसुफ शहा हे त्यांना सातत्याने मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. “आम्हाला मुलगाच पाहिजे, तुला मुलीच का होतात?” असा अजब आणि अमानवीय तर्क लावून या विवाहितेचा छळ केला जात होता. हा छळ केवळ घरापुरता मर्यादित राहिला नाही. दिनांक ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिंपळगाव काळे येथे आरोपींनी फिर्यादी सायमाबाई यांना शिवीगाळ केली. यावेळी संतापलेल्या पतीने अत्यंत बेजबाबदारपणे आणि कायद्याला केराची टोपली दाखवत, “तू मला तलाक देत नाहीस, तर मी तुला तलाक देत आहे… तलाक, तलाक, तलाक,” असे शब्द उच्चारून सायमाबाई यांच्याशी असलेले नाते तोडून टाकले. मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अंतर्गत ‘ट्रिपल तलाक’ बेकायदेशीर असतानाही, भरचौकात अशा प्रकारे पत्नीचा अपमान करण्यात आला.

पिडीत विवाहितेने जळगाव जामोद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११५(२), ३५२, ३४ आणि मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण अधिनियम २०१९ चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे करत आहेत.

समाज सुन्न; कायद्याचा धाक कोणाला?

२०१९ मध्ये केंद्र सरकारने ‘ट्रिपल तलाक’ विरोधी कडक कायदा संमत केला. तरीही, आजही मुलाच्या हव्यासापोटी पोटच्या लेकींना नाकारणारे आणि पत्नीला रस्त्यावर आणणारे प्रवृत्ती समाजात वावरत आहेत. एका २२ वर्षांच्या तरुण मातेला केवळ मुली झाल्या म्हणून अशा प्रकारे वाळीत टाकणे, हे आधुनिक समाजासाठी लज्जास्पद आहे. “मुलगा-मुलगी एक समान” हा नारा केवळ कागदावरच आहे का?, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

या घटनेतील आरोपी पती याकुब शहा आणि सासरा युसुफ शहा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोहार नगर आणि पिंपळगाव काळे परिसरातील नागरिक करत आहेत. पीडित सायमाबाई यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!