खामगाव: एटीएम कार्ड बदलून ५० वर्षीय व्यक्तीची १.३७ लाखांची फसवणूक; शहरात खळबळ

अजय टप

खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाची नजर चुकवून, तीन अज्ञात भामट्यांनी त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि खात्यातून १ लाख ३७ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस भामट्यांचा शोध घेत आहेत.

जलंब नाका, खामगाव परिसरातील रहिवासी असलेले ललेंद्र हरीभाऊ काबुकडे (वय ५० वर्षे) हे ३ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्थानिक बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी पैसे विड्रॉल केल्यानंतर ते बाहेर पडत असतानाच, तिथे दबा धरून बसलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. तुम्ही पैसे काढल्यानंतर तुमचे अकाउंट योग्यरित्या बंद झाले नाही, असे सांगून आरोपींनी काबुकडे यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून काबुकडे पुन्हा एटीएम केंद्रात गेले. यावेळी एका आरोपीने मदतीचा बहाणा करत काबुकडे यांचे एटीएम कार्ड स्वतःच्या हातात घेतले. आरोपीने कार्ड मशीनमध्ये टाकण्याचे नाटक केले आणि तुमच्या खात्यात काहीतरी तांत्रिक अडचण आहे, असे भासवले. याच गोंधळाचा फायदा घेत आरोपीने अत्यंत सफाईदारपणे काबुकडे यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना त्याच बँकेचे दुसऱ्या कोणाचे तरी कार्ड (क्र. ६५२२११२५३१५२९०८८) परत केले. काबुकडे यांना कार्ड बदलले गेल्याचा संशय आला नाही. कार्ड बदलल्यानंतर काही वेळातच आरोपींनी ललेंद्र काबुकडे यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १,३७,००० रुपये काढून घेतले. मोबाईलवर पैसे काढल्याचे संदेश आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे काबुकडे यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी ललेंद्र काबुकडे यांनी खामगाव शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३१८(४), ३१८(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे हे करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

एटीएम केंद्रावर अनोळखी व्यक्तींकडून मदत घेऊ नका. आपले कार्ड आणि पिन क्रमांक अत्यंत गोपनीय ठेवावा. पैसे काढल्यानंतर ‘कॅन्सल’ बटण दाबल्याची खात्री करावी. जर कोणी कार्ड तपासण्याच्या बहाण्याने मागितले तर सावध राहावे, असे आवाहन खामगाव शहर पोलिसांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!