तहसीलदारांच्या आदेशालाच केराची टोपली? मलकापूरात वाळू माफियांचे ‘राज’ कायम!;नाकाखाली अवैध वाळू साठे, महसूल यंत्रणा मात्र गप्प; जिल्हाधिकारी कारवाई करणार का?

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात अवैध वाळू साठेबाजीने पुन्हा डोके वर काढले असून महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, माननीय तहसीलदारांच्या आदेशानंतरही शहरातील विविध भागांत उघडपणे वाळूचे साठे होत असल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना अवैध वाळू साठ्यांची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हे आदेश कागदावरच राहिले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आदेशानंतरही अनेक ठिकाणी वाळूचे ढिगारे कायम असल्याचे दिसून येत आहे.

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या वाळू माफियांचे मनोबल इतके वाढले आहे का की त्यांना आता प्रशासनाचीही भीती उरलेली नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे सामान्य नागरिकांवर नियमांचे कठोर पालन केले जाते, तर दुसरीकडे अवैध वाळू साठ्यांवर मात्र कारवाईचा हात आखडता का घेतला जातो, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत.

मलकापूर शहरात अवैध वाळू साठेबाजी सुरू असताना संबंधित महसूल कर्मचारी आणि तलाठी यांची भूमिका काय आहे? तहसीलदारांच्या आदेशानंतरही कारवाई न होण्यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे? की काही अदृश्य शक्तींच्या दबावाखाली यंत्रणा काम करत आहे? अशा प्रश्नांनी आता प्रशासनाला घेरले आहे. “आदेश तहसीलदारांचा… पण अंमलबजावणी कोण करणार?”, हा प्रश्न सध्या मलकापूरकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. तहसीलदारांच्या आदेशाला जर खरोखरच केराची टोपली दाखवली जात असेल, तर हा केवळ शिस्तभंगाचा नव्हे तर संपूर्ण महसूल व्यवस्थेलाच आव्हान देणारा प्रकार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी लक्ष घालणार का?

मलकापूरातील अवैध वाळू साठ्यांच्या वाढत्या तक्रारी, तहसीलदारांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव आणि महसूल विभागाच्या संशयास्पद शांततेमुळे आता सर्वांच्या नजरा जिल्हाधिकाऱ्यांकडे लागल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का, की वाळू माफियांचे साम्राज्य असेच सुरू राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.“मलकापूरात वाळूचे ढिगारे वाढत आहेत, पण कारवाईचे ढोल मात्र शांत आहेत!”, याच चर्चेने सध्या संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!