अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत गुन्हेगारी आणि दुर्दैवी घटनांचे सत्र पाहायला मिळाले. मलकापूर, पिं. राजा, बोराखेडी आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ५ गंभीर घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्त्या, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, महिलेचा विनयभंग, वृद्धाला मारहाण आणि हुंड्यासाठी विवाहितेचा छळ या गुन्ह्यांचा समावेश असून पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
नांदुरा तालुक्यात बोरीच्या झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
मलकापूर ग्रामीण: नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील एका ४७ वर्षीय शेतकऱ्याने शेतात बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. विश्वनाथ साहेबराव क्षिरसागर, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विटाळी शिवारातील गट क्र. ७७ मधील शेतात ६ जून रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मृतकाचे नातेवाईक विष्णू गजानन क्षिरसागर यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृत्यूबाबत कुटुंबाचा कोणावरही संशय नाही. पुढील तपास पोलीस अंमलदार रघुनाथ जाधव करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती
मलकापूर शहर: मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशाल श्याम इंगळे (वय २६ वर्षे) रा. बेलाड या आरोपीने गावातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी गेल्या ५ महिन्यांत ५ ते ६ वेळा शारीरिक संबंध ठेवले. पीडितेला त्रास होऊ लागल्याने माता-पित्यांनी सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. सध्या पीडितेवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या जबाबवरून मलकापूर शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंघोळ करणाऱ्या महिलेचा विनयभंग; पिंपळगाव राजा पोलिसात ३ जणांवर गुन्हा
पिंपळगाव राजा: ढोरपगाव येथे एका ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला तिच्या घराच्या न्हानीत आंघोळ करत असताना, शेजारी राहणारा आरोपी ब्रम्हा साहेबराव मुंढे हा भिंतीवर पाणी टाकून वाईट उद्देशाने अश्लील चाळे करत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिच्याशी झटापट केली. तसेच त्याचे नातेवाईक साहेबराव मुंढे आणि शिवहरी मुंढे यांनी महिलेला पोलीस तक्रार केल्यास “तुला पाहून घेऊ, अशी धमकी दिली. पोलिसांनी ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामेश्वर बोरसे हे करत आहेत.
शेतातील नाली साफ करण्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला काठीने मारहाण
बोराखेडी: मोताळा तालुक्यातील तळणी शेतशिवारात नालीतील कचरा काढण्याच्या किरकोळ वादावरून ६५ वर्षीय वृद्ध शेतकरी सुरेश निवृत्ती नारखेडे यांना बेदम मारहाण करण्यात आली. शेजारील शेतकरी संजय तुकाराम चव्हाण याने सुरेश यांना काठीने जबर मारहाण केली, तर त्याचा पिता तुकाराम शेणू चव्हाण याने “याचे हात-पाय तोड” असे म्हणून चिथावणी दिली. पुन्हा नालीत उतरला तर खल्लास करून टाकू, अशी धमकीही आरोपींनी दिली. जखमी वृद्ध शेतकरी सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून, बोराखेडी पोलिसांनी जबाबवरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिलीप तडवी करत आहेत.
हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
जळगाव जामोद: वडशिंगी (ता. जळगाव जामोद) येथील २७ वर्षीय विवाहिता प्रतिभा मोरे हिचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पती सारीपुत्र उर्फ मयूर मोरे, सासरे प्रकाश मोरे, सासू अनिता मोरे यांच्यासह मेहकर व चिखली येथील एकूण ८ नातेवाईकांनी संगनमत करून, वडिलांकडून शेतीच्या कामासाठी २ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला. पैसे न आणल्याने प्रतिभा हिला सतत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला. पोलिसांनी ८ जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रविकांत बावस्कार हे करत आहेत.
