अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. मलकापूर शहर व ग्रामीण, खामगाव, शेगाव, बोराखेडी आणि जळगाव जामोद परिसरात तब्बल डझनभर गंभीर घटना समोर आल्या आहेत. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, महिलांचा विनयभंग व छळ, भरदिवसा आणि रात्री झालेल्या घरफोड्या, शेतशिवारातील वादातून जीवघेणी मारहाण आणि एका शेतकऱ्याची दुर्दैवी आत्महत्या अशा घटनांचा समावेश आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
खामगाव: येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला. गोपाळ नगर भागातील ज्ञानेश्वर मोतीराम आवारकर या नराधमाने शेजारी राहणाऱ्या एका १० वर्षीय चिमुरडीला घरात एकटी पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेला. या धक्क्यातून चिमुरडी सतत तणावात होती, अखेर कुटुंबाने विश्वासात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडितेच्या भावाने ‘चाईल्डलाईन १०९८’ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि आशिष चेचरे हे करत आहेत.
शेगाव: येथील सावता नगर येथील नितीन जुमळे यांचे कुटुंब पुणे येथे देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरांनी घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील १२ हजार रुपये रोख आणि २८ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
मलकापूर: शहरातील विद्याविकास नगर आणि संताजी नगर भागात ३ अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला. चोरांनी संतोष डोळसे यांच्या घरातून १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला, तर विकास चोपडे आणि नितेश गायकवाड यांच्या घरी चोरीचा अपयशी प्रयत्न केला.
खामगाव: शहरातील रहिवासी निळकंठ शास्त्री (वय ८१ वर्षे) यांच्याकडे मागील ३ वर्षांपासून भाड्याने राहणारा नितीन अर्जुन हिरळकर हा घरमालक बाहेर गावी गेले असताना खोलीतील इलेक्ट्रिक फिटिंग, सीलिंग फॅन, सब-मिटर आणि लोखंडी ग्रील असा २० हजार ५०० रुपयांचा माल चोरून पसार झाला.
मलकापूर ग्रामीण: अंतर्गत मोरखेड बुद्रुक शिवारात शेत रस्त्यासाठी हिस्सा देण्याच्या वादावरून वैभव जंगले, अनिकेत जंगले, सुनील जंगले आणि अनिल जंगले यांनी शाम रोकडे (वय ३४ वर्षे) व त्यांच्या भावाला लिंबाच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी छातीवर मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे हे करत आहेत.
अमडापूर: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या असोला नाईक येथील एक ३४ वर्षीय महिला ६ जून रोजी सकाळी दवाखान्यात जाते असे सांगून निघून गेली. ती अद्याप पर्यंत घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
जळगाव जामोद: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मानेगाव येथील २० वर्षीय तरुणी ६ जून रोजी संध्याकाळी घरून निघून गेली ती बेपत्ता झाली आहे. तिच्या डाव्या हातावर मोराचे पीस गोंदलेले आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी जळगाव. जामोद पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
