अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): दारू आणून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांच्या गुप्तांगावर लाथ मारून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हतेडी खुर्द येथे उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, स्वतःचे कृत्य लपवण्यासाठी निर्दयी मुलाने वडिलांचा मृतदेह शेतातील सरपणाच्या ढिगाऱ्यात टाकून जाळून खाक केला आणि वडील घरातून निघून गेल्याची खोटी कहाणी रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश करत आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या आहे.

हतेडी खुर्द (ता.बुलढाणा) येथील रहिवासी समाधान पुंजाजी घायवट (वय ४४ वर्षे) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल होती. या मिसिंग प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार गजानन सदाशिव काकडे करत होते. तपासादरम्यान ८ मे २०२६ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास समाधान घायवट आणि त्यांचा २१ वर्षीय मुलगा अनिकेत घायवट यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. मयत समाधान हे एका पार्टीमध्ये दारू प्यायले होते. त्यांनी रात्रीच्या वेळी मुलगा अनिकेत याला आणखी दारू आणून देण्यासाठी सांगितले. मात्र, मध्यरात्री दारू आणण्यास अनिकेतने स्पष्ट नकार दिला. या नकाराचा राग आल्याने समाधान घायवट यांनी हातात काठी घेतली आणि ते अनिकेतच्या अंगावर धावून गेले. वडिल आपल्यावर धावून आल्याचे पाहून आरोपी मुलगा अनिकेत याचाही राग अनावर झाला आणि त्याने वडील समाधान घायवट यांच्या गुप्तांगावर लाथ मारली. जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिसिंगचा तपास करत असताना तपास अधिकारी गजानन काकडे यांना अनिकेतच्या वागणुकीवर आणि बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहिती काढली. तसेच आरोपी अनिकेत घायवट याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, १७ मे २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, २३८, २३९ आणि २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद माळी हे करत आहेत. एका बेपत्ता व्यक्तीच्या तपासातून पोटच्या मुलानेच वडिलांचा खून करून मृतदेह जाळल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला
वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी अनिकेतने मध्यरात्रीच वडिलांचा मृतदेह हतेडी खुर्द शिवारातील शेतात नेला. तेथे असलेल्या जळतणाच्या ढिगाऱ्यात मृतदेह टाकला आणि तो पेटवून दिला. मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाल्यावर त्याने पुरावा नष्ट केला. एवढ्यावरच न थांबता, गावात आपल्यावर कोणाला संशय येऊ नये म्हणून अनिकेतने आपले वडील घरातून अचानक कुठेतर निघून गेल्याची खोटी माहिती नातेवाईकांना आणि गावकऱ्यांना दिली. यानंतर पोलिसातही वडिलांच्या मिसिंगची तक्रार दाखल केली.
