https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

पिंपळगाव राजा परिसरात संताप: घरात शिरून महिलेचा विनयभंग; भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल; बरफगाव येथील धक्कादायक प्रकार; आरोपीने ओलांडल्या मर्यादा, कायद्याचा धाक उरलाय की नाही?

अजय टप

नांदुरा,(प्रतिनिधी): ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा घरात शिरून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या घडलेल्या या कृत्यामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीने कायद्याला जणू केराची टोपली दाखवली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बरफगाव येथील रहिवासी असलेली एक ३५ वर्षीय महिला २६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विश्रांती घेत होती. घरकाम आटोपून त्या झोपलेल्या असताना, गावातीलच आरोपी भागवत शालीग्राम झांबरे याने त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. केवळ घरात शिरूनच तो थांबला नाही, तर त्याने झोपलेल्या पीडितेची महिलेची साडी धरून ती वर ओढली आणि “तू मला आवडते” असे म्हणून लज्जास्पद वर्तन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. आरोपीचा उद्देश अत्यंत हीन आणि वाईट असल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भरदिवसा घरात सुरक्षित असतानाही महिलेवर झालेल्या या हल्ल्याने ‘बळी तो कान पिळी’ या वृत्तीचे दर्शन घडवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम ७४ आणि ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रामेश्वर बोरसे हे करीत आहेत.

कायद्याचे वाभाडे काढणारी प्रवृत्ती

या घटनेने समाजातील विकृत मानसिकतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र पोलीस आणि सरकार महिला सुरक्षेसाठी विविध पावले उचलत असताना, दुसरीकडे अशा नराधमांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला दिसत नाही. एखाद्या महिलेच्या खाजगी जागेत, म्हणजे तिच्या स्वतःच्या घरात शिरून असा निंदनीय प्रकार करणे, हे कायद्याचे अक्षरश: वाभाडे काढण्यासारखेच आहे. भारतीय न्याय संहिताचे कलम ७४ आणि ७९ अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवीन कायद्यातील या कलमांमध्ये महिलांच्या सन्मानाला धक्का लावणाऱ्या कृत्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद आहे. मात्र, केवळ कागदावर कायदे असून उपयोग नाही, तर अशा विकृत प्रवृत्तींच्या मनात कायद्याची दहशत निर्माण होणे गरजेचे आहे, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

महिला सुरक्षितता धोक्यात?

बरफगाव सारख्या छोट्या गावात घडलेली ही घटना एक धोक्याची घंटा आहे. दुपारच्या वेळी महिला घरी एकट्या असताना अशा प्रकारे होणारे हल्ले पोलिसांच्या गस्तीवर आणि सामाजिक सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. आरोपीने ज्या निर्लज्जपणाने कृत्य केले, त्यावरून त्याला कायद्याची किंवा समाजाची कोणतीही भीती नसल्याचे स्पष्ट होते. गावपातळीवर अशा घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो, पण पीडितेने धाडस दाखवून पोलिसात धाव घेतली, हे कौतुकास्पद आहे. आता पोलिसांची देखील आरोपीला कठोर शासन करून आपली पार पाडत समाजात एक आदर्श घालून द्यावा, असे मत एका स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!