अजय टप
जळगाव जामोद, (प्रतिनिधी): जळगाव जामोद शहरात जमिनीच्या व्यवहारावरून एक मोठी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका नामांकित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जामोद येथील रहिवासी असलेले सागर मधुसुधन गांधी (वय २३ वर्षे) यांची खेलसोनजी येथे गट नं. ५२/१ मधील ०.८४ हेक्टर आर जमीन आहे. ही जमीन हडपण्याच्या किंवा त्या माध्यमातून फसवणूक करण्याच्या उद्देशाने आरोपी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद ईसा (वय ४५ वर्षे) रा. जळगाव जामोद याने एक मोठा कट रचला. आरोपीने सदर जमीन ३ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे भासवून त्याबाबतची एक बनावट ‘सौदा चिठ्ठी’ तयार केली. प्रत्यक्षात असा कोणताही व्यवहार झाला नसताना, केवळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून फिर्यादीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर सागर गांधी यांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली होती. या अर्जाची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विशेष आदेशानुसार जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी मोहम्मद मुस्ताक मोहम्मद ईसा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत. ३ कोटींच्या या मोठ्या व्यवहारामुळे जळगाव जामोदच्या व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यामागे आणखी काही लोकांचे हात आहेत का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, जळगाव जामोद परिसरातील अशा प्रकारच्या मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.