https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

देऊळगावात ‘श्रीमद संगीत भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहा’ला उत्साहात प्रारंभ

संग्रामपूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील देऊळगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमद संगीत भागवत कथा तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिर प्रांगणात सुरू झालेल्या या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होत असून, पंचक्रोशीतील भक्तांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या सप्ताहात प्रामुख्याने भागवताचार्य हभप सुनील महाराज घारड (चोंडी) यांच्या रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेचे निरूपण केले जात आहे. २७ एप्रिलपासून या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, कथेसोबतच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सप्ताहाच्या काळात दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत भक्तीमय वातावरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पहाटे काकडा आरती, सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ श्रीमद भागवत कथा वाचन व निरूपण, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० नामवंत कीर्तनकारांची हरि-कीर्तने होणार आहे.

सप्ताहात दररोज रात्री ८ वाजता राज्यातील नामांकित कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. त्यामध्ये २७ एप्रिल रोजी हभप विनायक महाराज जुमळे (आळंदी), २८ एप्रिल हभप मयूर महाराज आळंदीकर, २९ एप्रिल हभप गजानन महाराज गौडचौर (खरप), ३० एप्रिल हभप हरिओम महाराज सखारामपूरकर, १ मे हभप श्रीकांत महाराज (मुक्ताईनगर) तर पुढील सेवा हभप महादेव महाराज पकोदी, हभप संतोष महाराज कुटे (कारंजा) हे देणार आहेत.

या सप्ताहाची सांगता ४ मे रोजी होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत भागवताचार्य हभप सुनील महाराज घारड यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजेपासून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या ज्ञानयज्ञात सहभागी होऊन दर्शनाचा व श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देऊळगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!