पोलखोल: विदर्भाच्या प्रवेशद्वारी मृत्यूचा सापळा? मलकापूरच्या ‘हकिमी हॉस्पिटल’चा अजब कारभार; प्रशासकीय आशिर्वादाने रुग्णांच्या जीवाशी खेळ!

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात आरोग्याच्या नावाखाली ‘धंदा’ मांडणाऱ्या एका मोठ्या केंद्राचा धक्कादायक पर्दाफाश झाला आहे. शहरातील नामांकित समजले जाणारे ‘हकिमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, येथे नियमांची पायमल्ली आणि रुग्णांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ पाहून आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कागदोपत्री ‘स्पेशालिटी’चा डामडौल मिरवणाऱ्या या रुग्णालयाचे वास्तव मात्र ‘रामभरोसे’ असल्याचे समोर येत आहे.
कोणतेही रुग्णालय चालवण्यासाठी ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’ अंतर्गत नोंदणी आणि तिचे वेळोवेळी नूतनीकरण करणे अनिवार्य असते. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हकिमी हॉस्पिटलच्या बॉम्बे नर्सिंग सर्टिफिकेटचे नूतनीकरण अद्याप झालेले नाही. मुदतबाह्य कागदपत्रांच्या आधारे रुग्णालय सुरू ठेवणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही हे रुग्णालय खुशाल सुरू आहे. मग प्रश्न पडतो की, हा नियम धाब्यावर बसवण्याचे धाडस येते कुठून?
हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीवर सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ते म्हणजे येथील ‘स्पेशालिस्ट’ डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत. हृदयविकारासारख्या गंभीर विषयात जिथे सेकंदाला महत्त्व असते, तिथे तज्ज्ञ हृदय रोग तज्ञ उपलब्ध नसताना चक्क BAMS डॉक्टरांकडून तपासणी अहवाल तयार केले जात असल्याची धक्कादायक चर्चा आहे. जेव्हा एखादी शस्त्रक्रिया करायची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी तज्ज्ञांना बोलावून सोपस्कार पूर्ण केले जातात. मग प्रश्न असा पडतो की, दरम्यानच्या काळात रुग्णासोबत काही अघटित घडल्यास त्याला जबाबदार कोण? फक्त कागदोपत्री ‘MD Medicine’ दाखवून सामान्य रुग्णांची दिशाभूल केली जात आहे का, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
प्रशासकीय यंत्रणा ‘पाकीट’ संस्कृतीत गुंग?
या सर्व प्रकारात सर्वात संतापजनक बाब म्हणजे स्थानिक प्रशासनाचे मौन. उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथील ‘M.S.’ साहेबांच्या टेबलवर अनेक तक्रारी आणि प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र, हे अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे का पाठवले जात नाहीत? ‘वरकमाई’चा आकडा फिक्स असल्यानेच या प्रकरणांवर पडदा टाकला जात आहे का?, हॉस्पिटलच्या इमारतीला आणि लिफ्टला आवश्यक असलेल्या परवानग्यांचे काय झाले?, डोळ्यावर पट्टी बांधून कोणत्या ‘चमत्कारा’ची वाट पाहत आहे?, वैद्यकीय वर्तुळात अशी खमंग चर्चा आहे की, ‘पाकीट’ पोहोचले की सर्व काही सुरळीत होते. या ‘पाकीट’ संस्कृतीमुळेच सामान्य रुग्णांचा जीव धोक्यात घातला जात आहे.
बिनपगारी ‘फुल’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यथा
हॉस्पिटलमधील अंतर्गत वातावरणही तितकेच गढूळ असल्याचे समजते. नर्सिंग स्टाफ आणि कर्मचाऱ्यांमध्ये “बिनपगारी फुल अधिकारी” अशी चर्चा रंगत आहे. कर्मचाऱ्यांचे शोषण आणि नियमबाह्य कामाचा बोजा यामुळे येथील यंत्रणा पोखरली गेली आहे. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचेच समाधान नाही, तिथे रुग्णांना दर्जेदार सेवा कशी मिळणार?
कारवाई कधी होणार? जनता जाब विचारतेय!
हकिमी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा मुहूर्त आरोग्य विभाग कधी काढणार? एखादा मोठा अपघात किंवा रुग्णाचा मृत्यू होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? सामान्य रुग्ण सध्या भीतीच्या छायेखाली असून, जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून हॉस्पिटलचे ऑडिट करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!