पोलिसांनी मृत दाखवलेली तरुणी पोलीस स्टेशनमध्ये प्रकटली; वडिल आणि भावाला न केलेल्या गुन्ह्यात केले आरोपी;स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा प्रताप

अजय टप

मलकापूर, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो):स्वत:ला ‘सिंघम’ सिद्ध करण्याच्या नादात आणि पोलीस अधीक्षकांची कौतुकाची थाप पाठीवर पाडून घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने रचलेला तपासाचा ‘बनाव’ चव्हाट्यावर आला आहे. ज्या मुलीचा खून झाल्याचा दावा करत पोलिसांनी मध्य प्रदेशातून निष्पाप पिता-पुत्रांना बेड्या ठोकल्या होत्या, ती मुलगी चक्क जिवंत समोर आली आहे. या धक्कादायक ट्विस्टमुळे तपास पथकाच्या ‘मिशन इम्पॉसिबल’चा फुगा तर फुटलाच आहे, सोबतच आता खरा सस्पेन्स सुरू झाला आहे. जर ती मुलगी जिवंत आहे, तर मग ‘तो’ छिन्नविच्छिन्न मृतदेह कोणाचा?, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात काही दिवसांपूर्वी एक शिर नसलेला, छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मुलीचा मृतदेह आढळला होता. या थरारक हत्येचा तपास करताना एलसीबीच्या एका पथकाने कमालीची घाई दाखवली. कोणताही ठोस वैज्ञानिक किंवा फॉरेन्सिक पुरावा हाती नसताना, केवळ संशयावरून थेट मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून मृत समजल्या जाणाऱ्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली. तपास पथकाने या ‘वेगवान’ तपासाचे श्रेय लाटायला सुरुवात केली खरी, पण गुरुवारी या कथेत असा काही ‘ट्विस्ट’ आला की पोलिसांचे अवसानच गळाले. मृत समजली जाणारी मुलगी स्वत: बऱ्हाणपूर पोलिसांच्या ‘सखी वन स्टॉप’ रूममध्ये हजर झाली आणि तिने ‘मी जिवंत आहे, माझ्या निष्पाप वडिलांना आणि भावाला सोडा!’, अशी आर्त हाक मारली. मुलगी जिवंत समोर आल्यामुळे आता एलसीबीच्या पथकाने केलेल्या तपासावर आणि कायदेशीर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तपास पथकाने आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांचे मोबाइल लोकेशन, कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि सबस्क्राइबर डिटेल रेकॉर्ड तपासून ते घटनास्थळी होते का?, याची खातरजमा केली होती का?, जर गुन्हा घडलाच नाही, तर मग आरोपींचा ‘कबुली जबाब’ कसा घेण्यात आला? पोलिसांच्या दबावामुळे तर हा जबाब लिहून घेतला गेला नाही ना?, गुन्ह्याशी संबंधित वस्तूंचा जप्ती पंचनामा आणि घटनास्थळ पंचनामा नेमका कसा आणि कोणत्या आधारे पूर्ण केला गेला?, हा आता चौकशीचा विषय बनला आहे. तपास सुरू असताना नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांनी लॉकअपला भेट दिली आणि आरोपींशी वार्तालाभ केला, हे देखील समोर येणे गरजेचे आहे. स्वत:ची कॉलर टाईट करण्याच्या नादात पोलिसांनी दोन निष्पापांचे आयुष्य तुरुंगाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. आता पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे संकेत दिल्याने, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते आणि ‘अज्ञात’ मृतदेहाचा सस्पेन्स कधी संपतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पोलीस कोठडी नावालाच?

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केलेले आरोपी पुढील तपासकामी जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी न्यायालयाकडून उपरोक्त आरोपींची सहा दिवसांची पोलीस कोठडीही मिळवली होती. त्यामुळे सदर आरोपी तब्बल सहा दिवस जळगाव पोलिसांच्या ताब्यात होते. मग, प्रश्न असा उपस्थित होतो की, पोलीस कोठडीत असतांना स्थानिक पोलिसांनी कोणता तपास केला?, उपरोक्त आरोपींनी सदर गुन्हा नाकबुल असल्याचे एकदाही पोलिसांना सांगितले नाही का?, सांगितले असेल तर, पोलिसांनी त्या दिशेने तपास का केला नाही?, आरोपींनी न केलेला गुन्हास्वत:च्या अंगावर का घेतला?, याचे उत्तर जर पोलिसांना शोधता आले नसेल, तर पोलीस कोठडी फक्त नावालाच होती?, असा यक्ष प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!