अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तामगाव पोलिसांनी केलेली लाखो रुपयांच्या अनधिकृत कापूस बियाण्यांची मोठी कारवाई, दोन ठिकाणच्या चोऱ्या, शाळांमधील तोडफोड आणि मारहाणीच्या गंभीर घटनांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तामगाव: संग्रामपूर पंचायत समितीचे बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी रविकिरण सुगदेव नायकार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खिरोडा येथे नाकाबंदी करण्यात आली. संशयास्पद पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको गाडी क्रमांक एमएच-३०-बीडब्ल्यू-९५८५ थांबवून तपासणी केली असता, त्यात शासनाची परवानगी नसलेले अनधिकृत ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांचे ९ कट्टे आढळून आले. शेतकऱ्यांना जादा दराने विकण्याच्या उद्देशाने हे बियाणे आणले गेले होते. या कारवाईत DHOOM-2, CHAMPION 5, आणि PINKGUARD 4 कंपन्यांची एकूण ४४० बियाणे पाकिटे (किंमत ४ लाख ५८ हजार रुपये) आणि ४ लाखांची इको गाडी, असा एकूण ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी गुलाबराव मुरलीधर ठाकरे (वय ५६ वर्षे), शंकर उत्तम दांदळे (वय ४५ वर्षे), दोन्ही रा. सांगोला (ता.पातुर) यांना अटक करण्यात आली असून, विनोद पाटील उर्फ विनोद हरिदास वाघमारे (वय ३२ वर्षे) रा. शिर्ला अंधारे हा आरोपी फरार आहे.
सोनाळा: सिताराम अग्रवाल यांचे प्लॉटिंगमधील शेडसमोर, सोनाळा (ता. संग्रामपूर) येथून अजय पुरुषोत्तम अग्रवाल (वय ३० वर्षे) यांची लाल/धामणा रंगाची गावरान गाय (वय १० वर्षे) किंमत अंदाजे २९ हजार ५०० रुपये अज्ञात चोरांनी शेडसमोरून चोरून नेली. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रमेश खरात करत आहेत.
मलकापूर शहर: हनुमान नगर (मलकापूर) येथील नितीन जगदीश कोलते (वय ४७ वर्षे) यांनी आपली काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीजी-१५१० आपल्या घरासमोर उभी केली होती. काही वेळाने ते बाहेर आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले करत आहेत.
पिंपळगाव राजा: जनगणनेच्या कामासाठी शिक्षक विजय काशिनाथ प्रधान हे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा(बोरजवाळा) येथे गेले असता, शाळेच्या उघड्या खोलीत कॉम्प्युटरचे साहित्य अस्ताव्यस्त आणि तुटलेल्या अवस्थेत दिसले. अज्ञात माथेफिरूने खोलीत शिरून ७ मॉनिटर्स आणि २ सीपीयूची तोडफोड करत २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास गायकवाड हे करत आहेत.
धामणगाव बढे: नळकुंड (ता. मोताळा) येथील विलास उबा जाधव (वय २६ वर्षे) यांच्या घरासमोरील टिनपत्रे आरोपींनी न विचारता नेली. याचा जाब विचारण्यासाठी विलास गेले असता, आरोपी जीवन देवसिंग जाधव याने हातातील दगडाने विलास यांच्या उजव्या डोळ्यावर मारून गंभीर जखमी केले, तर कृष्णा देवसिंग जाधव याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव ग्रामीण: मुलगी परत का आणली?, या कारणावरून वृद्ध आई-वडिलांना पोटच्या मुला-सुनेने झोडपल्याची घटना हिंगणा कारेगाव (ता. खामगाव) येथे घडली. कौटुंबिक वादातून जानराव जगदेव जाधव ( वय ५५ वर्षे) आणि त्यांच्या पत्नीला त्यांचा मुलगा गणेश जाधव आणि सून चैताली जाधव यांनी अश्लील शिवीगाळ केली. मुलाने वडिलांना काठीने बेदम मारहाण केली, तर सुनेने सासूचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वृद्ध माता-पित्यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बोराखेडी: लघवीसाठी थांबलेल्या मेंढपाळाला कड्याने मारहाण करून केले रक्तबंबाळ केल्याची घटना परडा फाटा (ता. मोताळा) येथे घडली. फिर्यादी सतुबा नगदेव कोरडकर (वय ४० वर्षे) हे मोटारसायकल थांबवून लघवीसाठी उतरले असता, दारूच्या नशेत असलेल्या नाना रामा पिसे आणि त्याच्या एका साथीदाराने (रा. वारुळी) विनाकारण वाद घातला. नाना पिसे याने हातातील कड्याने सतुबा यांच्या कपाळावर, नाकावर आणि डोळ्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी सतुबा यांना उपचारासाठी बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोराखेडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
