नदीम शेख
चांडोळ,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): रक्षाबंधनाला अद्याप अवकाश असला तरी, एका भावाने आपल्या बहिणीप्रती असलेले कर्तव्य शेवटच्या श्वासापर्यंत निभावले. आपल्या लाडक्या बहिणीला सासरी सुरक्षित पोहोचवण्यासाठी गेलेल्या भावाचा परतीच्या प्रवासात रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील २५ वर्षीय राहुल रमेश शेळके या तरुणावर काळाने घाला घातला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
राहुलची बहीण मनमाड-नाशिक परिसरात राहते. त्याचे मेहुणे भारतीय सैन्यात देशाची सेवा करत असल्याने, बहिणीला प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राहुल स्वतः तिला सोडण्यासाठी गेला होता. ८ मे रोजी त्याने बहिणीला सुखरूप रेल्वेने रवाना केले. बहिणीला निरोप देताना, “काळजी घे, पोहोचल्यावर फोन कर” असे शब्द त्याच्या ओठावर असतील, पण तेच त्याचे शेवटचे शब्द ठरतील असे कुणालाही वाटले नव्हते.
बहिणीला सोडल्यानंतर राहुल ‘जनशताब्दी’ किंवा तत्सम रेल्वेने परत येत असताना, छत्रपती संभाजीनगर जवळील लासूर रेल्वे स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. चालत्या रेल्वेतून अचानक तोल गेल्याने राहुल खाली फेकला गेला. वेगवान रेल्वेच्या धक्क्याने आणि खाली पडल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे राहुलचा जागीच मृत्यू झाला.
हृदय पिळवटून टाकणारा अपघात
हा अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळावरील दृश्य पाहून उपस्थितांच्या काळजाचा थरकाप उडाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलच्या डोक्याचा एक भाग कापला गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या तरुणाची ओळख पटवण्यात सुरुवातीला अडथळे आले, मात्र कागदपत्रांवरून तो चांडोळचा राहुल शेळके असल्याचे स्पष्ट झाले. ज्या हातांनी काही तासांपूर्वी बहिणीला टाटा केले होते, तेच हात आता कायमचे शांत झाले होते.
चांडोळ गावावर दुःखाचा डोंगर
राहुल हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील चांडोळ येथील रहिवासी. त्याचे वडील रमेश शेळके सध्या कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. राहुलच्या निधनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावातील चुली पेटल्या नाहीत. एक उमदा, कष्टाळू आणि सुस्वभावी तरुण अशा पद्धतीने सोडून गेल्याने ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहुलचा मृतदेह चांडोळ येथे आणण्यात आला. गावातून त्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा जनसागर लोटला होता. प्रत्येक डोळ्यात पाणी आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच चर्चा होती, बहिणीला सोडून येताना भावाचा असा अंत व्हावा? देवा, हे कसले तुझे न्याय?
कुटुंबाचा आधार हरपला
२५ वर्षांचा राहुल हा कुटुंबाचा मोठा आधार होता. आपल्या भविष्याची स्वप्ने उराशी बाळगून तो मेहनत करत होता. सैन्यात असलेल्या मेहुण्यांची गैरहजेरीत बहिणीची जबाबदारी तो मोठ्या आनंदाने पार पाडत असे. त्याच्या जाण्याने शेळके कुटुंबाचा आधारस्तंभ ढासळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण आणि मोठा आप्तपरिवार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू
या घटनेची नोंद रेल्वे पोलिसांनी केली असून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुलचा तोल नेमका कसा गेला? डब्यात गर्दी होती का? की तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या तपासातून राहुल परत येणार नाही, हे सत्य पचवणे कुटुंबासाठी कठीण झाले आहे.
