खळबळजनक: विवाहितेचा छळ करून बळजबरीने पाडला गर्भ; दिराचा विनयभंग तर पतीकडून जिवंत जाळण्याची धमकी

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो ): हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणे, पतीचे परस्त्रीशी असलेले अनैतिक संबंध लपवण्यासाठी पत्नीला मारहाण करणे आणि चक्क सासरच्या मंडळींनी संगनमत करून विवाहितेचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, नराधम दिराने विवाहितेचा विनयभंग केला असून सासू-सासऱ्यांनी त्याला साथ दिल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये पतीसह चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुरी उर्फ ईश्वरी सुरज राठोड (वय २८ वर्षे) रा. सध्या शेंदुर्जन (ता. सिंदखेडराजा) यांचे लग्न २३ मे २०२४ रोजी चिखली येथे सुरज प्रभाकर राठोड (रा. तळवणी गाव, जि. ठाणे) यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडले होते. लग्नात मुलीच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे १० तोळे सोने, रोख १७ लाख रुपये आणि इतर चैनीच्या वस्तू हुंडा म्हणून दिल्या होत्या. मात्र, सुखी संसाराचे स्वप्न घेऊन सासरी गेलेल्या मयुरीचा छळ लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच सुरू झाला. लग्न झाल्यानंतर पती-पत्नी दोघे गोव्याला फिरायला गेले होते. तिथे मयुरीने पती सुरज याच्या मोबाईलवर वेगवेगळ्या मुलींचे फोन आणि आक्षेपार्ह फोटो पाहिले. यावरून तिने पतीला जाब विचारला असता, पतीने संतापून तिला मारहाण केली. तू जर हे कोणाला सांगितले, तर तुझ्या अंगावर पेट्रोल टाकून तुला जिवंत जाळून टाकीन, अशी भयानक धमकी पतीने तिला दिली. तेव्हापासून पती तिला सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागला.

लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांनी मयुरी गर्भवती राहिली. मात्र, पती सुरज राठोड याला मूल नको होते. तो दररोज दारू पिऊन घरी येत असे आणि मयुरीला बेदम मारहाण करत असे. मयुरीचा गर्भ पाडण्यासाठी सासरच्या सर्व मंडळींनी कट रचला. पती, सासू सुनिता, सासरे प्रभाकर आणि दीर दीपक यांनी संगनमत करून मयुरीला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात घडवून आणला. या घटनेमुळे विवाहितेला प्रचंड मानसिक धक्का बसला.

दिराचा विनयभंग आणि सासू-सासऱ्यांची निर्लज्ज साथ

जानेवारी २०२५ मध्ये पतीची बदली मुंबईवरून सोलापूरला झाली. पती आठवड्यातून एकदा घरी येत असे. दरम्यान, मयुरी घरी एकटी असताना तिचा दीर दीपक प्रभाकर राठोड याने तिच्या खोलीत शिरून तिचा विनयभंग केला. तू मला खूप आवडतेस, असे म्हणत त्याने मयुरीची साडी ओढून अश्लील चाळे केले. पीडितेने आरडाओरडा केला असता, तिचे रक्षण करण्याऐवजी सासू आणि सासऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. काय होत नाही, जसं तो सांगतो तसं कर, असे म्हणत त्यांनी पीडितेला गप्प राहण्यास भाग पाडले. सासरच्या या अमानवीय त्रासाला कंटाळून अखेर मयुरीने साखरखेर्डा पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. तिने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी पती सुरज प्रभाकर राठोड, सासू सुनिता राठोड, सासरे प्रभाकर रुपसिंग राठोड आणि दीर दीपक राठोड (सर्व रा. पाटील चाळ, तळवणी, जि. ठाणे) यांच्या विरोधात साखरखेर्डा पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ७५ (१), ७५ (१) (i), ७५ (१) (ii), ८९, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!