बुलडाणा: तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे पडले महागात; बोराखेडी पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

अजय टप

मोताळा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी आता कंबर कसली आहे. वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तलवारीने केक कापणाऱ्या एका तरुणासह त्याच्या मित्रावर बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. वाघजाळ फाटा येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी रात्री २१.३० वाजेच्या सुमारास राहुल गजानन वाघ (वय २२ वर्षे) रा. वाघजाळ) याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे निमित्त साधून राहुल आणि त्याचा मित्र करण ऊर्फ लक्ष्मण डमरू चव्हाण (वय २९ वर्षे) रा. नेहरुनगर, मोताळा हे दोघे एका पांढऱ्या रंगाच्या ‘सियाज’ कार क्रमांक एमएच*१३-एनव्ही-१३०३ ने वाघजाळ फाटा येथे आले. केवळ आनंद साजरा करण्याच्या नावाखाली राहुलने चक्क हातात धारदार तलवार घेतली आणि भररस्त्यात सार्वजनिक ठिकाणी केक कापला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तलवारीचे प्रदर्शन करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला.

जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असतानाही, सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचा वापर करून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तातडीने पावले उचलली. सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रवीण रामदास पडोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५, ७/२५, महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ (१) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बळीराम खंडागळे हे करीत आहेत.

वाढदिवसाचा ‘स्टंट’ बेतला जीवावर

आजकल तरुणांमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा ‘भाईगिरी’ दाखवण्यासाठी शस्त्रांसह वाढदिवस साजरा करण्याची एक चुकीची फॅशन रूढ होत आहे. मात्र, असा ‘स्टंट’ करणे कायद्याने गुन्हा आहे. राहुल वाघ याने आपल्या २२ व्या वाढदिवशी केलेली ही चूक आता त्याला पोलीस कोठडीची हवा खाण्यास कारणीभूत ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!