बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वार्ता: अपघात, जीवघेणा हल्ला आणि विनयभंगाच्या घटनांनी जिल्हा हादरला

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात आणि लगतच्या खामगाव परिसरात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, एका तरुणाचा मृतदेह नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, किरकोळ वादातून धारदार शस्त्राने गळा चिरण्याचा प्रयत्न आणि महिलेचा विनयभंग केल्याच्या घटनांचीही पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली आहे.

खामगाव-शेगाव हायवेवर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, कार चालक फरार

खामगाव: खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जयपूर लांडे पुलाजवळ एक भीषण अपघात घडला. परतवाडा येथील रहिवासी महेश शंकरराव राऊत (वय ४८ वर्षे) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-२७-एम-२४६२ ने नशिबपूरकडे जात असताना, भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एचआर-५०-सी-९०३३ ने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी कार चालक वाहन घटनास्थळावर सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी दिनेश शंकरराव राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४), १२५(a)(b) सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला

बोरखेडी: बोराखेडी पोलीस ठाण्यांतर्गत राजूर येथील पुलावर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. परमेश्वर बळीराम खंडागळे (वय ४५ वर्षे) हे जेवण करून शतपावली करत असताना, आरोपी शेख नईम शेख अलीम याने कसलाही विचार न करता फिर्यादीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

महिलेचा विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी

बोराखेडी परिसरातच एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला आपल्या घरासमोर उभी असताना शेजारी राहणारा आरोपी प्रशांत इंगळे याने विनाकारण शिवीगाळ सुरू केली. जेव्हा महिलेने विचारणा केली, तेव्हा आरोपीने वाईट हेतूने तिचा हात धरून विनयभंग केला. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या मुलीलाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३५२, ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील वाघ हे करत आहेत.

नदी पात्रात आढळले तरुणाचे प्रेत: नरवेल येथील घटना

मलकापूर: तालुक्यातील धुपेश्वर पूर्णा नदी पात्रात स्वप्नील मोहन कोलते (वय ४२ वर्षे) या तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वप्नील हा ७ मे रोजी कोणालाही न सांगता घरातून दुचाकी घेऊन निघाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह नदीत सापडला. मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. मृत्यूचे नेमके कारण समजले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!