अजय टप
बुलडाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून मारहाण, लोखंडी पाईपने केलेले हल्ले, भरधाव वेगाने झालेला जीवघेणा अपघात आणि अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
मलकापूर: अंगणात कचरा उडाल्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मारहाण
मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पान्हेरा येथे शेतातील कचरा अंगणात उडाल्याच्या शुल्लक कारणावरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादी ज्ञानेश्वर देवकर (वय ३८ वर्षे) हे आपल्या ढोरांचे चारापाणी करत असताना कचरा शेजारील सुधाकर खिरोडकर यांच्या अंगणात उडाला. याचा राग धरून आरोपीने देवकर यांना चापटा-बुक्क्यांनी आणि फायबरच्या फावड्याच्या दांड्याने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव (शिवाजीनगर): लोखंडी पाईपने हल्ल्याच्या तीन घटना
खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिली घटना (जुना फैल): फिर्यादी शेख जमील शेख अहमद यांना आरोपी इरफान कुरेशी आणि हकीम कुरेशी यांनी संगनमत करून शिवीगाळ केली. आरोपी इरफानने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दुसरी घटना (कौटुंबिक वाद): जुना फैल भागातच शाहीन परवीन यांचे पती शेख हकीम कुरेशी यांना आरोपी शेख जावेद, शेख मलंग, भोला व इतरांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने डोक्यात मारून जखमी केले. तिसरी घटना (सजनपुरी): मासे विक्रीचा व्यवसाय करणारे रमेश बावने यांच्या घरात घुसून राजेश आणि गणेश गुजरीवाल यांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. “पुन्हा नादी लागला तर खलास करू” अशी धमकीही देण्यात आली. या तिन्ही प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
बोराखेडी: स्वतःच्याच भरधाव दुचाकीच्या अपघातात चालकाचा मृत्यू
मोताळा तालुक्यातील खरबडी रोडवर एक भीषण अपघात झाला. फिर्यादी बेबाबाई निकाळजे यांचे पती विजय निकाळजे (वय ५० वर्षे) हे आपल्या दुचाकीने (एमएच-२८-बीडी-४७१५) जात असताना, वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवल्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान अकोला येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बोराखेडी पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
नांदुरा: ६२ हजारांच्या मुद्देमालासह अवैध दारू तस्कर अटकेत
नांदुरा पोलिसांनी महाळुंगी बस स्थानक परिसरात मोठी कारवाई केली आहे. आरोपी गजानन शिवदास करंकार हा विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून अवैध देशी दारूची वाहतूक करत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३०० नग देशी दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ६२,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धामणगाव बढे: अज्ञात ट्रकच्या धडकेत कारचे मोठे नुकसान
रोहीणखेड ते धामणगाव बढे रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ पहाटे ३ च्या सुमारास एका अज्ञात ट्रकने मारुती सुझुकी (एमएच-२८-बीक्यू-९४०५) या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, ३२४ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
