अजय टप
बुलडाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):अलिकडच्या काळात कौटुंबिक व्यवस्थेला लागलेली अनिश्चिततेची कीड, संवादाचा अभाव, आर्थिक विवंचना आणि क्षणिक रागाच्या भरात किंवा आकर्षणाच्या आहारी जाऊन घेतले जाणारे टोकाचे निर्णय संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करत आहेत. याचाच एक अत्यंत चिंताजनक आणि मन हेलावून टाकणारा प्रत्यय बुलडाणा जिल्ह्यातून समोर आला आहे. अवघ्या २४ ते ४८ तासांच्या कालावधीत जिल्ह्यातील देऊळगाव राजा आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन वेगवेगळ्या कुटुंबांतील तीन तरुणी आणि त्यांच्यासोबत दोन निष्पाप बालक बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.
भांडे घासण्याचे काम करण्यासाठी जाते म्हणून गेलेली २५ वर्षीय तरुणी, रात्रीच्या वेळी घरातून अचानक निघून गेलेली २१ वर्षांची युवती, आणि नणंदेकडे जाते सांगून आपल्या १० वर्षांच्या निष्पाप मुलासह बेपत्ता झालेली ३० वर्षीय विवाहिता—या तीनही वेगवेगळ्या प्रकरणांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलासह संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. या सर्व प्रकरणांमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये रीतसर बेपत्ता झाल्याची झाल्याच्या नोंदा करण्यात आल्या आहेत.
“भांडे धुण्यास जाते” सांगून गेलेली २५ वर्षीय तरुणी बेपत्ता; देऊळगाव राजा शहरातील खळबळ
देऊळगाव राजा: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीपुरा, लहुजी नगर भागातील एका अत्यंत गरीब, कष्टकरी कुटुंबातील २५ वर्षीय तरुणी १६ मे रोजी रात्री ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली. “मी गावात नेहमीप्रमाणे लोकांच्या घरचे भांडे धुण्याचे काम करण्यासाठी जात आहे,” असे तिने आपल्या २० वर्षीय लहान भावाला सांगितले होते. मात्र, रात्र उलटून गेली, दुसरा दिवस उजाडला, तरी ती घरी परतलीच नाही.
बहिणीच्या विरहाने आणि काळजीने व्याकुळ झालेल्या मजुरी करणाऱ्या लहान भावाने अखेर १७ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली. या तरुणीच्या पश्चात घरात केवळ तिचे वृद्ध माता-पिता आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणारा भाऊ आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना, प्रामाणिकपणे काम करून कुटुंबाला हातभार लावणारी बहीण अचानक गायब झाल्याने या कष्टकरी कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार पोलीस करीत आहेत.
चालठाणा गावातून २१ वर्षीय युवतीचे गूढ पलायन; ‘त्या’ काळोख्या रात्री काय घडले?
जळगाव जामोद: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चालठाणा या ग्रामीण भागातून समोर आली आहे. शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एका ४८ वर्षीय हताश वडिलांनी आपल्या २१ वर्षांच्या तरुण मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे. १६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सर्व कुटुंब नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. मात्र, मध्यरात्री १० ते १७ मे च्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान, ही २१ वर्षीय युवती कोणालाही काहीही न सांगता राहत्या घरातून अचानक निघून गेली.
सकाळी जेव्हा कुटुंबाला मुलगी घरात नसल्याचे समजले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी गावातील परिसर, नातेवाईक, तिचे मित्र-मैत्रिणी आणि आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये तिचा शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर १७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या किंवा नुकत्याच वयात आलेल्या मुली अशा प्रकारे मध्यरात्री घर सोडून जात असल्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जामोद पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आला आहे.
नणंदेकडे जाण्याच्या बहाण्याने विवाहिता १० वर्षांच्या चिमुरड्या मुलासह बेपत्ता; कौटुंबिक वादाची किनार?
तिसरी आणि अत्यंत गंभीर घटना पुन्हा एकदा देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असोला जहागीर या गावातून समोर आली आहे. येथील एका ४० वर्षीय शेतकऱ्याची ३० वर्षीय पत्नी आपल्या १० वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन १६ मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घरातून निघाली. “मी बुलडाणा येथे राहणाऱ्या आपल्या नणंदेकडे जात आहे,” असे तिने कुटुंबाला सांगितले होते. गावानजीकच्या असोला फाट्यावरून ती एका ‘काळी-पिवळी’ गाडीत बसली. मात्र, ती नणंदेकडे पोहोचलीच नाही आणि आपल्या घराकडेही परतली नाही.
या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्या विवाहितेसोबत तिचा १० वर्षांचा निष्पाप मुलगाही आहे. पती आणि नातेवाईकांनी बुलडाणा शहर व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता, ती तिथे पोहोचलीच नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर हताश झालेल्या पतीने १७ मे रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या वाढत्या घटनांमागील सामाजिक आणि मानसिक कारणे काय?
अवघ्या २४ तासांत एकाच जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या भागांतून तरुण स्त्रिया आणि मुले बेपत्ता होणे, ही केवळ पोलिसांसाठीची एक केस नसून समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. या घटनांच्या मुळाशी गेल्यास खालील प्रमुख मुद्दे समोर येतात. त्यामध्ये क्षणिक रागातून घेतलेले निर्णय आणि संवादाचा अभाव
अनेकदा कौटुंबिक जीवनात होणारे किरकोळ वाद, सासर-माहेरचे ताणतणाव किंवा पती-पत्नीमधील मतभेद यावर योग्य वेळी संवाद न साधल्यास, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जाते. अशा वेळी घरातून पळून जाणे हाच एकमेव मार्ग वाटू लागतो. मात्र, हा निर्णय घेताना मागे राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांच्या किंवा पतीच्या सामाजिक प्रतिष्ठेचा पूर्णपणे बळी दिला जातो. सोशल मीडिया आणि आभासी जगाचे अपरिपक्व आकर्षण
आजच्या डिजिटल युगात फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अल्पपरिचित व्यक्तींशी मैत्री करणे सोपे झाले आहे. वास्तविक आयुष्यातील अडचणींपेक्षा सोशल मीडियावरील आभासी जग आणि तिथले खोटे प्रेम अधिक आकर्षित करू लागते. वयाच्या २१ ते २५ वर्षांच्या दरम्यान योग्य-अयोग्याची जाण नसल्याने अनेक तरुणी अशा फसव्या आकर्षणाला बळी पडतात आणि घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतात. निष्पाप बालकांचे हक्क आणि भविष्यातील संभाव्य हानी
असोला जहागीरच्या घटनेत, एका १० वर्षांच्या बालकाला आईच्या निर्णयामुळे अनिश्चिततेच्या गर्तेत जावे लागले आहे. आई-वडिलांच्या किंवा वैयक्तिक आयुष्यातील निर्णयात या निष्पाप मुलांना का ओढले जाते? जर भविष्यात या महिलांची फसवणूक झाली, किंवा त्या कोणत्याही गुन्हेगारी टोळीच्या हाती लागल्या, तर या लहान मुलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण होण्याची भीती नाकारता येत नाही.
कुटुंबांची बिकट परिस्थिती आणि सामाजिक बदनामीचे शल्य
या तीनही घटनांमधील पीडित कुटुंबे ही अत्यंत सर्वसामान्य पार्श्वभूमीची आहेत. कोणी शेतमजूर आहे, कोणी अल्पभूधारक शेतकरी आहे, तर कोणी रोजंदारीवर काम करणारे आहे. आधीच आर्थिक विवंचना, त्यात कुटुंबातील तरुण मुलगी किंवा पत्नी अशा प्रकारे निघून गेल्याने या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेती आणि मजुरी सोडून आता या पालकांना आणि भावंडांना पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागात अशा घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. कुटुंबातील इतर सदस्यांचे विवाह किंवा सामाजिक संबंध यावर याचा अत्यंत विपरीत परिणाम होतो.
क्षणभराच्या मोहापोटी, किंवा रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभराची जखम देऊन जातो. घरातून निघून गेलेल्या या तरुणींना जेव्हा वास्तववादी जगाचे चटके बसतील, तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल. तूर्तास, पोलीस प्रशासन या तीनही प्रकरणांत कसून तपास करत असून, या महिला आणि निष्पाप मुले सुखरूप आपल्या घरी परत यावीत, हीच संपूर्ण जिल्ह्याची अपेक्षा आहे. समाजातील वाढती ही विकृती थांबवण्यासाठी आता केवळ पोलीस कायदे पुरेसे नसून, कौटुंबिक स्तरावर मुलांशी सुसंवाद साधणे आणि त्यांना नैतिक मूल्यांची जाणीव करून देणे ही काळाची गरज बनली आहे.
