बुलढाणा शहरात मोठी कारवाई: पोलीस अधीक्षकांच्या ‘झाडाझडती’नंतर स्थानिक गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर; एक्का-बादशहा जुगार अड्ड्यावर छापा, ८ आरोपींसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांचा आढावा घेत चांगलीच ‘झाडाझडती’ घेतली. एसपींच्या या कडक पवित्र्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्हा पोलीस दल पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहे.

याचाच प्रत्यय रविवारी, दिनांक १७ मे २०२६ रोजी आला. पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या ‘एक्का-बादशहा’ नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ आरोपींना रंगेहात अटक केली असून, त्यांच्याकडून नगदी रोकड आणि जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख बारा हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात आणि परिसरात छुप्या मार्गाने अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या गोपनीय यंत्रणा गतिमान करत रविवारी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ‘एक्का-बादशहा’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पोलिसांनी रविवारी जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. त्यावेळी पैशाच्या हारजीतवर एक्का बादशहा नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून एकूण ५ लाख १२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने बुलढाणा शहरातील जुगार चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारांचे धाबे दणाणले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा या वरिष्ठ त्रिकुटाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशान्वये पोलीस अंमलदार दिगंबर कपाटे, वनिता शिंगणे, राकेश नायडू, अमोल शेजोळ, जयंत बोचे, अमोल अंभोरे, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे यांनी केली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याचे कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यालयातच अवैध धंदे? पोलीस अधीक्षकांच्या कारवाईने सत्य आले समोर!

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा जुगार अड्डा सुरू होता, यावरून शहरात आजवर छुप्या पद्धतीने अवैध धंदे सर्रास सुरू होते, हे आता उघड झाले आहे. स्थानिक नागरिकांमधून यापूर्वीही याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. मात्र, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेतलेल्या कडक झाडाझडतीनंतरच या मोठ्या अड्ड्यावर थेट हातोडा पडला. मुख्यालयातच झालेली ही कारवाई इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदेवाल्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.

नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक आणि अपेक्षा

या मोठ्या कारवाईनंतर बुलढाणा शहरातील सुजाण नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे जाहीर कौतुक केले आहे. शहरात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. केवळ जुगारच नव्हे, तर अवैध दारू विक्री, अंमली पदार्थ आणि सट्टा बाजारावरही अशीच कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!