अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो); जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश आले आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणारी दुचाकी आणि दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. या कारवाईत एकूण ८८ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी, दिनांक १७ मे २०२६ रोजी करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे प्रमाण रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. याच आदेशाचे पालन करत, बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी विशेष गस्त आणि तपासाचे आदेश दिले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, १७ मे रोजी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध देशी दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस अंमलदार सुनिल मिसाळ, अनंता फरतळे, गणेश वाघ यांच्या पथकाने हद्दीतील संशयास्पद मार्गावर पाळत ठेवून सापळा रचला. दरम्यान, एका मोटारसायकलवरून दोन इसम संशयास्पदरीत्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांची नाकेबंदी करून त्यांना थांबवले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ८८,०२० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरूनच दारूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक कुठून केली जात होती आणि हा साठा कोणाकडे पोहोचवला जाणार होता, याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या माफियांमध्ये खळबळबळ उडाली आहे.
