अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत चार वेगवेगळ्या घटनांमध्ये काही व्यक्ती बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये देऊळगाव राजा, नांदुरा आणि बुलडाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन तरुणी/महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. या सर्व प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंगच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
देऊळगाव राजा परिसर–काम करण्याचे सांगून घराबाहेर पडलेली २५ वर्षीय तरुणी बेपत्ता
देऊळगाव राजा: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २५ वर्षीय तरुणी १६ मे २०२६ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडली. “मी गावात कामासाठी जात आहे,” असे तिने कुटुंबाला सांगितले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही. अखेर कुटुंबाने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे.
देऊळगाव राजा (ग्रामीण हद्द): नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेली महिला व लहान मुलगा बेपत्ता
देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असणारी ३० वर्षीय महिला आपल्या १० वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन दिनांक १६ मे २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास घरून निघाल्या. “मी बुलडाणा येथे नातेवाईकांकडे जाते,” असे सांगून त्या स्थानिक फाट्यावरून प्रवासी वाहनात बसल्या. मात्र, त्या नियोजित ठिकाणी पोहोचल्याच नाहीत. सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊनही कोणताही सुगावा न लागल्याने अखेर कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
नांदुरा परिसर–कुटुंबातील सदस्य बाहेर गेले असताना २१ वर्षीय तरुणी बेपत्ता
नांदुरा तालुक्यातील एका गावातील कुटुंब दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांची २१ वर्षीय मुलगी व इतर भावंडे हजर होती. सकाळी ८ वाजता कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरी परत आली असता, २१ वर्षीय तरुणी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले. नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि परिचितांकडे शोध घेतला, परंतु ती मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
बुलडाणा शहर–घरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
बुलडाणा शहरातील एका कॉलनीतील कुटुंबातील सदस्य दिनांक १७ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता बाजार करण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची १९ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. संध्याकाळी ६.३० वाजता जेव्हा कुटुंबीय घरी परतले, तेव्हा ती घरात दिसली नाही. कुटुंबाने तात्काळ आजूबाजूचा परिसर, नातेवाईक आणि मैत्रिणींकडे चौकशी केली, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात हजर राहून पालकांनी तक्रार नोंदवली.
