मलकापुरात खळबळ: हिंदू तरुणी आणि विवाहित परधर्मीय इसम रंगेहात पकडले; ‘लव्ह जिहाद’ की ब्लॅकमेलिंगचा विळखा?

अजय टप

मलकापूर, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक परिसरात घडलेल्या एका थरारक नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण मलकापूर शहरासह बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या मोताळा तालुक्यातील एका २४ वर्षीय हिंदू तरुणीसोबत ३९ वर्षांचा विवाहित मुस्लिम इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने एका कथित ‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या दोघांना रंगेहात पकडून पोलीस ठाण्यात आणल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करून जाळ्यात ओढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मोताळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका २४ वर्षीय हिंदू तरुणीचे अवघ्या दोन दिवसांवर लग्न ठरले असून, घरात लग्नाची लगबग सुरू आहे. अशातच शनिवारी दुपारच्या सुमारास ही तरुणी मलकापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये ३९ वर्षीय विवाहित मुस्लिम इसमासोबत आल्याची कुणकुण काही हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना लागली. हे दोघेही लॉजमधून बाहेर पडताना काही युवकांच्या नजरेस पडले. वयातील मोठे अंतर आणि दोघांचे संशयास्पद हावभाव पाहून कार्यकर्त्यांना संशय आला. त्यांनी तातडीने या दोघांचा पाठलाग सुरू केला. दोघेही घाईघाईने बसस्थानक परिसराकडे जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांना तिथेच गाठले आणि त्यांची विचारपूस सुरू केली. दोघांना त्यांची नावे आणि ओळख विचारली असता, धक्कादायक वास्तव समोर आले. तरुणी ही हिंदू समाजातील असून सोबत असलेला ३९ वर्षीय इसम हा मोताळा शहरातीलच रहिवासी आणि आधीच विवाहित असलेला मुस्लिम व्यक्ती असल्याचे उघड झाले. दोन दिवसांवर लग्न असलेल्या तरुणीसोबत परधर्मीय विवाहित प्रौढ व्यक्ती आढळल्याने उपस्थित तरुण आणि नागरिकांचा संताप अनावर झाला.

या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात पाहता पाहता मोठी गर्दी उसळली आणि काही काळ तीव्र तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्या दोघांनाही ताब्यात घेऊन मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्रा फिरवली आणि संबंधित तरुणीच्या पालकांना तसेच नातेवाईकांना मोताळा येथून पोलीस ठाण्यात पाचारण केले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असता, शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने “मी माझ्या प्रियकराला भेटण्यासाठी आले होते”, अशी कबुली दिल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात रंगली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून या कथित कबुलीला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्रेम की ब्लॅकमेलिंगचा विळखा?

या संपूर्ण प्रकरणात केवळ प्रेमसंबंध नसून यामागे ‘ब्लॅकमेलिंग’ आणि ‘मानसिक दबावाचे’ मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या जोरदार चर्चेनुसार, संबंधित ३९ वर्षीय विवाहित इसमाकडे या २४ वर्षीय तरुणीचे काही वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा गोपनीय माहिती असण्याची दाट शक्यता आहे. या ब्लॅकमेलिंगच्या संशयामुळेच हिंदू संघटनांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून, याची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार आणि त्याचा हेतू स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

पोलीस अधिकृत खुलाशाच्या प्रतीक्षेत

शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणावरून कमालीची शांतता आणि गुप्तता पाळली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे, एवढी मोठी घटना घडूनही आणि दोन्ही बाजूंना पोलीस ठाण्यात आणूनही अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. तरुणीचे कुटुंब लग्नाच्या उंबरठ्यावर असल्याने आणि मुलीच्या भवितव्याचा विचार करून कायदेशीर पाऊल उचलण्यास कचरत असल्याचे समजते. मात्र, पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलीस काय भूमिका घेतात आणि अधिकृत काय खुलासा करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मूळ मुद्याचा छडा लावणे गरजेचे!

मलकापुरात घडलेली ही घटना अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे. एका बाजूला दोन दिवसांवर आलेले लग्न आणि दुसऱ्या बाजूला १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विवाहित परधर्मीय इसमासोबत लॉजमध्ये आढळलेली तरुणी, हे चित्र केवळ संशयास्पद नाही तर विचार करायला लावणारे आहे. जर यात खरोखरच ब्लॅकमेलिंग किंवा फसवणुकीचा अंश असेल, तर पीडितेच्या बदनामीच्या भीतीने गुन्हेगाराचे मनोधैर्य वाढता कामा नये. पोलिसांनी केवळ ‘तक्रार नाही म्हणून गुन्हा नाही’ अशी भूमिका न घेता, या तरुणीची विश्वासात घेऊन चौकशी करावी आणि या प्रकरणाच्या मुळाशी जावे, हीच मलकापूरकरांची न्याय्य मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!